तरुणाला धमकावून पैसे मागणारे दोन पोलिस निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 19:59 IST2025-05-06T19:59:10+5:302025-05-06T19:59:45+5:30

तरुण-तरुणी गाडी बाजूला गप्पा मारत थांबले होते.

pune crime two policemen suspended for threatening and demanding money from a youth | तरुणाला धमकावून पैसे मागणारे दोन पोलिस निलंबित

तरुणाला धमकावून पैसे मागणारे दोन पोलिस निलंबित

पुणे : मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या महाविद्यालयीन तरुणाला गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५० हजारांची मागणी करणाऱ्या येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दयानंद शिवाजी कदम, अश्विन ईश्वर देठे अशी निलंबित केलेल्या पोलिस कर्मचऱ्यांची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की येरवड्यातील काॅमर झोन कंपनीच्या रस्त्यावर २४ एप्रिल रोजी सायंकाळी तरुण-तरुणी गाडी बाजूला गप्पा मारत थांबले होते. सायंकाळी सातच्या सुमारास गस्त घालणारे पोलिस कर्मचारी देठे आणि कदम तेथे आले. त्यांनी मोटारीत अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. गुन्हा दाखल न करण्यासाठी त्यांनी तरुणाकडे ५० हजार रुपये मागितले होते.

तक्रारदार तरुण एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यादिवशी तो येरवड्यातील एका डाॅक्टरांकडे आला होता. घाबरलेल्या तरुणाने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाैकशी करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी चौकशी करुन दोघांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून दिला होता. तसेच या प्रकरणाची चाैकशी लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्याकडे सोपविण्यात आली होती. याप्रकरणात पोलिस कर्मचारी देठे आणि कदम दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.

 

 

 

Web Title: pune crime two policemen suspended for threatening and demanding money from a youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.