Video : दोन गट भिडले, दगड भिरकावले... ! एकवीरा देवीच्या यात्रेला गालबोट; कार्ला गडाच्या पायथ्याला हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:51 IST2026-03-27T12:49:58+5:302026-03-27T12:51:36+5:30
- या गोंधळात काही हुल्लडबाजांनी डोंगरउतारावरील गवताला आग लावली.

Video : दोन गट भिडले, दगड भिरकावले... ! एकवीरा देवीच्या यात्रेला गालबोट; कार्ला गडाच्या पायथ्याला हाणामारी
लोणावळा : चैत्र शुद्ध सप्तमीला कार्ला गडावर आई एकवीरेचा पालखी सोहळा बुधवारी (दि. २५ मार्च) व गुरुवारी (दि. २६ मार्च) पार पडला; परंतु एकवीरा मंदिर पायथ्याला काही जणांच्या आपापसांतील भांडणाचा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायथ्याला एकवीरा गडावर देवीची पालखी पुढे नेण्यावरून बुधवारी (दि. २५ मार्च) रात्री पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाड्याच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा हे दोन्ही गट आमनेसामने आले. स्थानिक मंडळी देवस्थान ट्रस्ट आणि पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद थांबवला. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पालखी सजवण्यासाठी केलेला खर्च आणि सोशल मीडियावरील वेगवेगळ्या कमेंट्स यामुळे हा वाद पेटला असल्याचे सांगण्यात येत आहे. या गोंधळात काही हुल्लडबाजांनी डोंगरउतारावरील गवताला आग लावली. तसेच दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली.यात १७ जण जखमी झाले आहेत.
'अफवांवर विश्वास ठेवू नका'
पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा यांच्यात आपापसात पूर्वीपासूनच वैमनस्य आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या कारणांवरून या दोन्ही ठिकाणच्या लोकांची भांडणे झालेली आहेत. मिरवणूक आणि पालखीबाबत त्यांचा कुठलाही वाद नाही. त्यांचे वैयक्तिक वादातून हे भांडण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यात्रेत वाद निर्माण करणे उचित नाही. या किरकोळ वादामुळे पूर्ण यात्रेला गालबोट लागते. याचा परिणाम स्थानिकांच्या व्यवसायावरही होतो. या भांडणाशी देवस्थान अथवा देवीच्या पालखीचा कसलाही संबंध नाही. जुन्या वादातून हा प्रकार घडला आहे. यात्रा सुरळीतपणे सुरू असून, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सर्व भाविकांना दर्शनासाठी मंदिर पूर्णवेळ खुले आहे.- दीपक हुलावळे, अध्यक्ष, एकवीरा देवस्थान ट्रस्ट
पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. दर्शन सुरळीत सुरू आहे. भाविकांनी निःसंकोच दर्शनासाठी यावे. सोशल मीडियावरील चुकीचे किंवा खोटे मेसेज, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. - दिनेश तायडे, पोलिस निरीक्षक, लोणावळा ग्रामीण