नशेसाठी "टर्मीन" इंजेक्शनची विक्री; इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 15:39 IST2025-03-11T15:38:35+5:302025-03-11T15:39:53+5:30

पोलिसांनी हडपसर भागातील मोरे वस्ती, मांजरी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

pune crime Two arrested for illegally selling injections for intoxication | नशेसाठी "टर्मीन" इंजेक्शनची विक्री; इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे अटकेत

नशेसाठी "टर्मीन" इंजेक्शनची विक्री; इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे दोघे अटकेत

पुणे : नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेनटरमाईन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर तपास पथकाकडून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख रुपये किमतीच्या मॅफेनटरमाईन सल्फेटच्या १९० बाटल्या जप्त करण्यात आल्या.

योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. मांजरी, हडपसर), निसार चाँद शेख (वय २३, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस शिपाई महेश चव्हाण यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हडपसर भागातील मोरे वस्ती, मांजरी परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. औषध विक्रीचा परवाना नसतानाही व औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसतानाही केवळ नशेसाठी ते औषधांची विक्री करीत होते.

त्यांच्याकडून औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो. तसेच मृत्यू होऊ शकतो, हे माहीत असतानाही नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशाने विक्री केल्याप्रकरणी दोघांवर हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करीत आहेत.

Web Title: pune crime Two arrested for illegally selling injections for intoxication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.