Pune Crime: ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:22 IST2025-08-02T16:22:12+5:302025-08-02T16:22:37+5:30
काळेपडळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही, पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला

Pune Crime: ज्याने केला खून त्यानेच पोलीस कंट्रोल रूमला फोन करून दिशाभूल केली
पुणे: दारु पिल्यानंतर आई-बहिणीवरून शिव्या दिल्याच्या रागातून एकाने झोपलेल्या मित्रावर लोखंडी पहार घालून त्याचा खून केला. त्यानंतर त्यानेच पोलिस कंट्रोल रूमला फोन करुन दुचाकीवरून आलेल्या चौघांनी मारहाण केल्याचे सांगितले. पण, काळेपडळ पोलिसांनी त्याचा हा डाव यशस्वी होऊ दिला नाही. पोलिस खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोन तासात खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
रविकुमार शिवशंकर यादव (३३, रा. साईगंगा सोसायटीसमोरील पत्र्याची शेड, हांडेवाडी रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर किसन राजमंगल सहा (२०, रा. हांडेवाडी रोड, मुळ रा. मोतीहारी, बिहार) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन सहा याची रस्त्याच्या कडेला नर्सरी आहे. त्या ठिकाणी रविकुमार यादव हा रस्त्याच्या कडेला टेडीबिअर विकत असे. तेथेच पत्र्याच्या शेडमध्ये तो राहत होता. किसन सहा याने पोलिस नियंत्रण कक्षाला शनिवारी (दि. २) पहाटे ४ वाजून ५२ मिनिटांनी फोन करुन कळवले की, त्याचा मित्र रविकुमार यादव याला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुकानातून बेडशीट व गादी दिली नाही, म्हणून मारहाण करुन गंभीर जखमी केले.
ही माहिती मिळताच रात्रगस्तीवरील अधिकारी यांनी उंड्री - हांडेवाडी रोडवरील पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन पाहणी केली असता रविकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. सहायक पोलिस निरीक्षक सुतार यांनी लागेचच त्याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याचा मृत घोषित केले.
त्यानंतर पोलिसांनी फोन करणार्या किसन सहा याच्याकडे वारंवार विचारपूस केली असता त्याच्या सांगण्यात विसंगती दिसून आली़. आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर तेथे दुचाकीवरुन आलेले चौघे दिसत होते. परंतु, त्यांची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसून येत नव्हती. किसन सहा हा वारंवार त्याचे स्टेटमेंट बदलत होता. आजूबाजूला राहत असलेल्या लोकांकडे चौकशी केली असता, त्यांनी यादव आणि सहा या दोघांमध्ये भांडणे झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी किसन सहा याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. किसन सहा व रविकुमार यादव हे रात्री दारु पित बसले असताना रविकुमार याने विनाकारण आई-बहिणीवरून शिवीगाळ करुन, मारहाण केली. त्यापूर्वीही त्याने अशीच शिवीगाळ करुन मारहाण केली होती. त्याचा किसनला राग होता.
त्यामुळे पहाटे तो झोपलेला असताना त्याने डोक्यात लोखंडी पहारेने वार करुन त्याचा खून केला. त्यावेळी तेथे दुचाकीवरून चार लोक आले होते. त्याचा गैरफायदा घेऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी खरा प्रकार उघडकीस आणत आरोपीला २ तासात अटक केली. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास सुतार, रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, उपनिरीक्षक अनिल निंबाळकर यांच्यासह पथकाने केली.