मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड; दोन वर्षांपासून देत होता गुंगारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:19 IST2025-03-16T13:19:09+5:302025-03-16T13:19:56+5:30
- दोन पिस्तूल, चार जिवंत काडतुसे जप्त

मंगला चित्रपटगृहाजवळील खून प्रकरणातील पंडित गँगचा म्होरक्या गजाआड; दोन वर्षांपासून देत होता गुंगारा
पुणे : पंडित गँगचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ पंडित ऊर्फ पिंटू ऊर्फ भाऊ दशरथ कांबळे (२९, रा. ताडिवाला रोड, खड्डा झोपडपट्टी) याला शिवाजीनगर पोलिसांनीअटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूले, चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. खून आणि मोक्काच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता.
सूर्यकांत उर्फ पंडित याने शाळेत असताना १३ व्या वर्षी साथीदाराचा खून केला. त्याच्या मुंडक्यासोबत फुटबॉल खेळला. दोन वर्षांपूर्वी मंगला चित्रपटगृहाबाहेर नितीन म्हस्के याचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता, अशी माहिती पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गिल म्हणाले की, पंडित कांबळे याच्या टोळीची ताडिवाला रोड व दांडेकर पूल परिसरात दहशत आहे. पूर्व वैमनस्यातून या टोळीने १५ ऑगस्ट २०२३ च्या रात्री मंगला चित्रपटगृहाच्या मागे नितीन मोहन म्हस्के (३५, रा. ताडीवाला रोड) याला तलवार, कोयता, रॉड, दगडाने मारून निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यात शिवाजीनगर पोलिसांनी २० आरोपींना अटक केली होती. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या गँगचा म्होरक्या पंडित कांबळे हा फरार झाला होता. तो काही केल्या सापडत नव्हता. शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक ११ मार्च रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार सचिन जाधव यांना बातमीदाराने बातमी दिली की, खुनाच्या गुन्ह्यातील पंडित कांबळे हा दांडेकर पुल, दत्तवाडी परिसरात येणार आहे. बातमीची खातरजमा केल्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला.
दांडेकर पूल येथील दीक्षित बागेसमोर तो आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ पिस्तुले व ४ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गेल्या १९ महिन्यांपासून तो फरार होता. या फरार कालावधीत त्याने गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या सीमेवरील गावात राहत असल्याचे सांगितले. मोबाइल वापरत नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता, तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वाटसरूंना अडवून त्यांच्याकडून मोबाइल घेऊन नातेवाइकांशी संपर्क करत असे. त्यामुळे पोलिसांची वेळोवेळी दिशाभूल होत होती.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलिस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सूर्यवंशी, उपनिरीक्षक अजित बडे, पोलिस हवालदार रुपेश वाघमारे, दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, राजकिरण पवार, महावीर चलटे, अतुल साठे, पोलिस अंमलदार सचिन जाधव, प्रवीण दडस, सुदाम तायडे, श्रीकृष्ण सांगवे यांनी केली.
पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार
पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून, अल्पवयीन असल्यापासूनच तो गुन्हे करत आला आहे. त्याच्यावर यापूर्वी २ खुनाचे व इतर ४ गंभीर स्वरूपांचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील मुंडी मर्डर हा अत्यंत गाजलेला व अतिशय क्रूर पद्धतीने त्याने अल्पवयीन असताना खून केला होता. येरवड्यातील नदीच्या बेटावर खून केल्यानंतर त्याचे मुंडके धडावेगळे करून त्याने मित्राबरोबर मुंडक्याचा फुटबॉल खेळला होता. त्याच्या पंडित टोळी व यल्ल्या टोळी अशा दोन टोळ्या असून, दोन्ही टोळ्यांचा तो प्रमुख आहे. ताडिवाला रोड, बंडगार्डन परिसर, दत्तवाडी, दांडेकर पूल परिसरात त्याची दहशत आहे.