Pune Crime: तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करुन निर्घुण खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:58 IST2022-11-16T09:58:22+5:302022-11-16T09:58:30+5:30
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून गुंडाला तडीपार करण्यात आले होते

Pune Crime: तडीपार गुंडाचा कोयत्याने वार करुन निर्घुण खून
पुणे : पूर्ववैमनस्यातून तडीपार गुन्हेगाराच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खून करण्यात आला. सुमित ऊर्फ काकासाहेब जाधव (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सुमित जाधव हा अशोका म्युज सोसायटीजवळून जात असताना तिघा जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. तिघा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमित जाधव याला गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे अशा प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने त्याला तडीपार करुन अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे सोडण्यात आले होते.