Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:40 IST2025-06-25T20:40:07+5:302025-06-25T20:40:57+5:30

पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला या असा आग्रह करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

pune crime swargate Case Police harassed victim in Swargate rape case; Lawyers allege | Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप

पुणे : स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास होत असल्याचा आरोप पीडितेचे वकील ॲड. असीम सरोदे व ॲड. श्रीया आवले यांनी केला आहे. पोलीस पीडितेला पोलीस स्टेशनला या असा आग्रह करीत आहेत. कशासाठी ते सांगत नाहीत, लेखी पत्र देत नाहीत. पीडितेला वारंवार पोलीस स्टेशनला का बोलविण्यात येत आहे? असा सवालही त्यांनी केला आहे.

स्वारगेट बसस्थानकात २५ फेब्रुवारी रोजी पहाटे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना घडली होती. आरोपीने साताऱ्याची बस तिकडे लागते अशी दिशाभूल करून पीडितेला बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेऊन बलात्कार केला होता. आरोपीला त्याच्या गावाहून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून पीडितेबाबत वादग्रस्त विधाने करून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला होता. आजमितीला आरोपी हा न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, स्वारगेट बलात्कार प्रकरणात पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास दिला जात आहे. असे वकिलांचे म्हणणे आहे.

आरोपीला जामीन मिळू नये यासाठी त्यांच्या वकिलांच्या मदतीने युक्तिवाद करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यांच्या वकिलांना पुण्याच्या कोर्टात या केससाठी येण्यास वेळ नाही. म्हणून पोलिसांनी पीडितेच्या वकिलांना पुढची तारीख घेण्याचा आग्रह करणे, त्यासाठी पीडितेने कोर्टात यावे व पुढची तारीख मागावी असा दबाव आणण्याचे प्रकार झाले. पोलिसांचे असे वागणे चुकीचे आहे. पीडितेचा असा छळ करणार असाल तर त्याबाबत आम्हाला तक्रार करावी लागेल. तिने घटनेबाबत जबाब दिला आहे व तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आता तिला पुन्हा-पुन्हा पोलीस स्टेशनला लेखी पत्र न देता बोलवणे चालणार नाही, याची पोलिसांनी नोंद घ्यावी, असा इशारा पीडितेच्या वकिलांनी दिला आहे.

पीडितेला कुठल्याच प्रकारची अडचण किंवा त्रास होईल अशी कृती पोलीस विभागाकडून होणार नाही. तरी पीडितेशी चर्चा करून त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील - अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

Web Title: pune crime swargate Case Police harassed victim in Swargate rape case; Lawyers allege