शाळेत धक्कादायक प्रकार; वर्गात तंबाखू-अल्कोहोलयुक्त पदार्थ आढळले;सात विद्यार्थ्यांना बेदम मार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 13:17 IST2026-03-08T13:17:00+5:302026-03-08T13:17:31+5:30
- या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेत तातडीची बैठक घेण्यात आली.

शाळेत धक्कादायक प्रकार; वर्गात तंबाखू-अल्कोहोलयुक्त पदार्थ आढळले;सात विद्यार्थ्यांना बेदम मार
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गातील सात विद्यार्थ्यांना वर्गातीलच एका विद्यार्थ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाची बदली करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
या घटनेनंतर पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेत तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान माजी सरपंच दीपक खैरे व अमोल जगताप यांच्या उपस्थितीत काही ग्रामस्थांनी सातवीच्या वर्गाची झडती घेतली. यावेळी वर्गात शीतपेये, अल्कोहोलयुक्त पेये, तंबाखू तसेच इतर काही पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
विद्यार्थ्यांनी उपस्थितांसमोर सांगितले की, वर्गातील एका विद्यार्थ्याची मोठी दहशत असून, तो वारंवार इतरांना मारहाण करतो. संबंधित विद्यार्थ्याला शिक्षक पाठीशी घालत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला. मात्र घटनेच्या वेळी संबंधित विद्यार्थी व त्याचे पालक गैरहजर असल्याने उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गटशिक्षणाधिकारी प्रीतम कोकणे तसेच पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलिस शिपाई नारायण वाळके, राम जाधव, नारायण सानप, योगेश आव्हाड व गणेश केंद्रे यांनी शाळेत भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर मारहाणीची माहिती देत शरीरावरील जखमांचे व्रणही दाखवले.
या प्रकरणातील दोषी शिक्षकावर कारवाई करून बदली करण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी व पोलिसांनी प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
हिवरे कुंभार जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल. - प्रीतम कोकणे, गटशिक्षणाधिकारी, शिरूर
हिवरे कुंभार येथे विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना निंदनीय आहे. पालकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित विद्यार्थी व त्याच्या पालकांना बोलावून समज देण्यात येईल. - सोमनाथ कचरे, पोलिस उपनिरीक्षक