शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:23 IST2025-09-01T15:23:28+5:302025-09-01T15:23:42+5:30
या कारवाईत पोलिसांनी ॲक्टिव्हा मोटारसायकलसह १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त
शिरूर : शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथील मलठण रस्त्यावर दुचाकीवर फिरणाऱ्या दोन संशयितांना शिरूर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिसांनी ॲक्टिव्हा मोटारसायकलसह १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे समीर ऊर्फ नवाब वजीर शेख (वय २०, रा. शिरटे, ता. वाळवा, जि. सांगली) आणि दीपक शिवलिंग वांगणे (२०, रा. अमरदीप सोसायटी, कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे), अशी आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई सचिन आजिनाथ भोई यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ७:४५ वाजता पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन युवक मलठण रस्त्यावर दुचाकीवर पिस्तुले आणि जिवंत काडतुसे घेऊन फिरत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत पथक तयार केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार अक्षय कळमकर, पोलिस शिपाई सचिन भोई, रवींद्र आव्हाड, निखिल रावडे, विजय शिंदे, नीरज पिसाळ, रवींद्र काळे आणि अजय पाटील यांचा समावेश होता.
पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान दोन पिस्तुले आणि १० जिवंत काडतुसे आढळली. पुढील चौकशीत एका संशयिताच्या घरातून आणखी एक पिस्तूल जप्त करण्यात आले. याप्रकरणी भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कायदा कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहेत.