Pune Crime: पुण्यात भरदिवसा पीएमपी थांब्यावर शाळकरी मुलावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 18:00 IST2025-12-02T17:59:54+5:302025-12-02T18:00:03+5:30
मुलाकडे रागाने बघितले आणि अचानक त्याच्याकडे असलेल्या शस्त्राने मुलाच्या हातावर वार केला.

Pune Crime: पुण्यात भरदिवसा पीएमपी थांब्यावर शाळकरी मुलावर वार
पुणे : पीएमपी बसची वाट पाहत थांबलेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलावर शस्त्राने वार केल्याची घटना सोमवारी महर्षीनगर भागात घडली. या घटनेत मुलाच्या हाताला दुखापत झाली असून पोलिस पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी जखमी मुलाने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाळकरी मुलगा कोंढव्यातील बधेनगर भागात राहायला आहे. तो सोमवारी (१ डिसेंबर) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घरी निघाला होता. तो महर्षीनगर भागातील पुजारी उद्यानाजवळ असलेल्या पीएमपी थांब्यावर थांबला होता. त्यावेळी तेथे एकजण आला. त्याने मुलाकडे रागाने बघितले आणि अचानक त्याच्याकडे असलेल्या शस्त्राने मुलाच्या हातावर वार केला.
मुलाने आरडाओरडा केल्यानंतर आरोपी दोन साथीदारांसाेबत तेथून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास भारमळ यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलिस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट तपास करत आहेत.