शासनाने मागणी मान्य केल्याने जबाबदारी वाढली; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 11:47 IST2025-12-17T11:47:24+5:302025-12-17T11:47:49+5:30
पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्यावतीने आयोजित केलेल्या ४१ व्या क्रीडा स्पर्धा शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झाल्या.

शासनाने मागणी मान्य केल्याने जबाबदारी वाढली; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मत
पुणे : आपल्या मागणीनुसार राज्य शासनाने एकाच वर्षात १२ पोलिस ठाणी, २ पोलिस उपायुक्त, २ हजार अंमलदार असे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे, असे मत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केले.
पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्यावतीने आयोजित केलेल्या ४१ व्या क्रीडा स्पर्धा शिवाजीनगर पोलिस मुख्यालयात झाल्या. या स्पर्धांच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त संजय पाटील, अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त कृषिकेश रावले, उपायुक्त निखिल पिंगळे, उपायुक्त मिलिंद मोहिते, उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले, नंदा वग्याणी आदी उपस्थित होते.
आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, पुणे शहर पोलिस दलाने मागील पावणेदोन वर्षांत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी त्यामुळे पोलिस ठाण्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे पोलिस दलाच्या मागणीनुसार शासनाने वेळेआधीच पूर्तता केली आहे. मागील अनेक गंभीर गुन्ह्यासह विविध घटनांमध्ये चांगली कामगिरी केल्याचेही आयुक्तांनी नमूद केले.
सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले, खेळ भावनेने आपल्या सर्वांना एकत्रित आणले आहे. याचा फायदा आगामी पोलिस स्पर्धेत होणार असून सर्व खेळाडूंनी आतापासूनच तयारी करावी. खेळामुळे आपला फिटनेस वाढून ताणतणाव कमी होण्यास मदत होते.