पहिली पत्नी, संशय अन् नैराश्य... पुण्यात व्यावसायिकाने पत्नीला संपवले; पोलिसांना स्वतः दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:07 IST2026-02-27T16:06:55+5:302026-02-27T16:07:27+5:30
पुण्यात एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पहिली पत्नी, संशय अन् नैराश्य... पुण्यात व्यावसायिकाने पत्नीला संपवले; पोलिसांना स्वतः दिली माहिती
Pune Crime: पुण्यातील खडकी परिसरातील चिखलवाडी भागात एका ५६ वर्षीय रिअल इस्टेट व्यावसायिकाने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी वारंवार चारित्र्यावर संशय घेत भांडण करत असल्याच्या रागातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. या घटनेनंतर आरोपीने स्वतःच पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून खुनाची माहिती दिली.
नेमकी घटना काय?
दिलीप नांबुरी कंदाथिल आणि त्याची पत्नी बिंदू कंदाथिल (५३) हे खडकी येथील ओरियन कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास होते. दिलीप हा रिअल इस्टेट व्यवसायात असून गेल्या काही दिवसांपासून तो आर्थिक अडचणीत होता. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास या दाम्पत्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या दिलीप याने पत्नीचे तोंड चादरीने दाबून तिचा जीव घेतला.
स्वतःच केला पोलिसांना फोन
पत्नीची हत्या केल्यानंतर अनेक तास दिलीप मृतदेहासोबतच घरात होता. अखेर बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याने स्वतः पोलिसांना फोन केला आणि मी माझ्या पत्नीचा खून केला आहे, असे सांगितले. माहिती मिळताच खडकी पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बेडरूममधून बिंदू यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीपचे हे दुसरे लग्न होते. त्याची पहिल्या पत्नीला दिलीप अजूनही भेटतो, असा संशय बिंदू यांना होता. या कारणावरून घरात दररोज खटके उडत होते. बिंदू या नैराश्यावर उपचार घेत होत्या, असेही दिलीपचे म्हणणे आहे. व्यवसायात मोठा तोटा झाल्यामुळे दिलीपवर मोठे कर्ज होते. या आर्थिक विवंचनेमुळे तो आधीच तणावाखाली होता.
दरम्यान, खडकी पोलिसांनी दिलीप कंदाथिल याला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. उपनिरीक्षक शरद देठे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीने दिलेल्या माहितीची पोलीस पडताळणी करत असून, हत्येचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि सखोल चौकशीनंतर स्पष्ट होईल.