पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजवर छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणात दलाल महिलेसह तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:15 IST2026-02-15T17:14:40+5:302026-02-15T17:15:45+5:30
तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दलाल महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.

पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजवर छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणात दलाल महिलेसह तिघांना अटक
पुणे : वेश्याव्यवसाय प्रकरणात गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंधक कक्षाने पुणे-सातारा रस्त्यावरील एका लाॅजवर छापा टाकला. या कारवाईत एका युवतीला ताब्यात घेण्यात आले. तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दलाल महिलेसह तिघांना अटक करण्यात आली.
वर्षा शंकर शिरसाठी (३५, रा. विजयनगर, चिंचवड), अनिल मदन जेधे (३५, रा. पेपर मिलसमोर, साने चौक, चिंचवड) आणि जीवन प्रमोद इंगोले (३३, सध्या रा. साई लाॅज, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात सहकार नगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक आणि व्यापार प्रतिबंध अधिनियमान्वये (पीटा) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील साई लाॅजमध्ये एका युवतीला संशयित आरोपी दलाल शिरसाठी, जेधे यांनी आणले होते. अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले जात असल्याची महिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांनी लाॅजमधून एका अल्पवयीन युवतीला ताब्यात घेतले.
चौकशीत संशयितांनी अल्पवयीन युवतीला पैशांचे आमिष दाखवून तिला वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले. पोलिस निरीक्षक छगन कापसे, उपनिरीक्षक इम्रान नदाफ, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, रेश्मा कंक, इंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.