पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:24 IST2025-04-06T16:24:38+5:302025-04-06T16:24:48+5:30
दिव्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आली असताना अचानक बेपत्ता झाली.

पुण्यात पोलिसांची तत्परता; हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी अवघ्या दोन तासांत सापडली
पुणे - पुण्यातील शेळके वस्तीतून हरवलेली आठ वर्षांची चिमुरडी दिव्या कमलाकर मासाळे हिला पुणे पोलिसांनी केवळ दोन तासांत शोधून काढत तिच्या पालकांच्या ताब्यात दिले. या जलद आणि अचूक कारवाईबद्दल बिबवेवाडी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घटनेची माहिती अशी की, दिव्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आली असताना अचानक बेपत्ता झाली. तिच्या वडिलांनी तात्काळ बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी त्वरीत तपास सुरू करत परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासली. या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवत दिव्याचा ठावठिकाणा लावला आणि अवघ्या दोन तासांत तिला सुरक्षितरीत्या शोधून काढले.
दिव्याला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून, पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि दक्षता यामुळे एक संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या प्रसंगानंतर पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.