Pune Crime : पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त; दोन आरोपींना अटक, ८ हजार लिटर रसायन जप्त
By किरण शिंदे | Updated: February 6, 2026 13:21 IST2026-02-06T13:21:17+5:302026-02-06T13:21:59+5:30
या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात रसायन जप्त करण्यात आले आहे.

Pune Crime : पुण्यात अवैध दारूभट्टी पोलिसांकडून उध्वस्त; दोन आरोपींना अटक, ८ हजार लिटर रसायन जप्त
पुणे - शहरातील अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वाघोली परिसरात मोठी कारवाई करत अवैध दारू बनवणारी हातभट्टी उध्वस्त केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात रसायन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रल्हाद कदम राठोड (वय २५) आणि अंकिता गणेश गुडदावत (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी वाघोली परिसरात एक जागा भाड्याने घेऊन गावठी हातभट्टीच्या माध्यमातून अवैध दारू तयार करण्याचा कारखाना सुरू केला होता.
गुन्हे शाखा युनिट ७ चे पोलिस अंमलदार निर्णय लांडे आणि बाळासाहेब तानपुरे यांना या अवैध व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत संबंधित ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल ८ हजार लिटर अवैध दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन जप्त केले. या जप्त मालाची अंदाजे किंमत सुमारे २ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
छाप्यावेळी आरोपी हातभट्टीच्या माध्यमातून दारू तयार करण्याची तयारी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी संपूर्ण भट्टी उद्ध्वस्त करत साहित्य जप्त केले आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी हा अवैध व्यवसाय किती काळ चालवला, तयार होणारी दारू कुठे विकली जाणार होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ७ चे प्रभारी पोलिस निरीक्षक संतोष सोनवणेसह त्यांच्या पथकाने केली.