वरिष्ठाचे नाव सांगून सराफाची फसवणूक करणारा पोलिस हवालदार निलंबित; विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 20:24 IST2025-05-21T20:23:49+5:302025-05-21T20:24:20+5:30
वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते.

वरिष्ठाचे नाव सांगून सराफाची फसवणूक करणारा पोलिस हवालदार निलंबित; विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्तांची कारवाई
पुणे : शहर पोलिस दलातील माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून एका सराफ व्यावसायिकाला ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले. व्यावसायिकाने पैसे मागितल्यानंतर टाळाटाळ करून त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका पोलिस हवालदारास निलंबित करण्यात आले आहे.
गणेश अशोक जगताप, असे निलंबनाची कारवाई झालेल्या विशेष शाखेच्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. पोलिस हवालदार जगताप यांनी औंध येथील एका ज्वेलर्सच्या दुकानातून शहर पोलिस दलातील एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव सांगून ८ लाख २२ हजार २२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेतले होते. सराफ व्यावसायिकाने जगताप यांच्याकडे दागिन्याच्या पैशाची मागणी केल्यानंतर सुरुवातीला टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी देऊन पैसे न देता त्यांची फसवणूक केली. यानंतर सराफ व्यावसायिकाने जगताप यांच्याविरोधात विशेष शाखेकडे तक्रार केली होती. त्यानंतर
विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून जगताप यांना संबंधित सराफ व्यावसायिकास दागिने किंवा पैसे देण्याचे आदेश दिले होते. मात्र, जगताप यांनी या आदेशाचे पालन केले नाही.
शेवटी विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी जगताप यांच्यावर बेजबाबदार, बेफिकीर, नैतिक अधःपतन आणि गैरवर्तनाचा ठपका ठेवत मुंबई पोलिस (शिक्षा व अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१) (अ-२) व नियम ५च्या तरतुदीनुसार आणि मुंबई पोलिस अधिनियम १९५१ मधील नियम २५ नुसार निलंबनाची कारवाई केली आहे. निलंबन कालवधीत कोणत्याही प्रकारची खासगी नोकरी किंवा व्यवसाय स्वीकारू नये, तसेच निलंबन कालावधीमध्ये दररोज पोलिस मुख्यालयातील राखीव पोलिस निरीक्षकासमोर हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले आहे.