Pune Crime : बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;बांगलादेशी महिला व अमली पदार्थ प्रकरणी तीन गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 19:21 IST2026-02-13T19:21:32+5:302026-02-13T19:21:43+5:30
बुधवार पेठ कारवाईप्रकरणी गुन्हे दाखल

Pune Crime : बुधवार पेठेत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन;बांगलादेशी महिला व अमली पदार्थ प्रकरणी तीन गुन्हे दाखल
पुणे : बुधवार पेठेत पुणे पोलिसांकडून मंगळवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यानंतर वेश्याव्यवसायास प्रवृत्त करणे, बांगलादेशी महिला आणि अमली पदार्थ या कोम्बिंगदरम्यान दिसून आल्याने तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या गुन्ह्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. तसेच महिलांना कुंटणखान्यात ठेवून वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या कमाईवर आपली उपजीविका भागवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रणजित आणि त्याच्या साथीदारावर पोलिस निरीक्षक छगन कापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा)नुसार गुन्हा दाखल केला आहे. बुधवार पेठेतील सपना बिल्डिंग येथे कोम्बिंग ऑपरेशनद्वारे कारवाई केल्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २६ वर्षीय तरुणीला वेश्याव्यवसायस प्रवृत्त करून तिला पैशाचे आमिष दाखवण्यात आले. नंतर तिला कुंटणखान्यात ठेवून वेश्याव्यवसाय करून घेतल्याप्रकरणात राजन, मुल्ला, शांताबाई, जोहरूद्दीन शेख आणि रेश्मा नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरीक्षक कांचन मोहन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील माचीस बिल्डिंग येथे कारवाई करत पीटाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, तिसरा गुन्हा बुधवार पेठेत केलेल्या कारवाईत चेतक हॉटेलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर चरस बाळगल्याप्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला. रामेश्वर विभीषण बिराजदार (३१, रा. गणराज हॉटेलच्या पार्किंगमधील खोलीत, बाजीराव रोड, मूळ रा. लातूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस शिपाई सुमित खुट्टे यांनी फिर्याद दिली आहे.