'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 12:16 IST2025-07-01T12:15:09+5:302025-07-01T12:16:28+5:30
हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

'..नाहीतर,हात-पाय उडतील';औंधमधील नामांकित शाळेला बॉम्ब ठेवल्याची धमकी
पुणे (औंध) : पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या परिसरात सिटी इंटरनॅशनल स्कूल, औंध या नामांकित शाळेच्या ईमेलवर धक्कादायक धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये, शाळेच्या परिसरात शक्तिशाली स्फोटके ठेवली असून इमारत तातडीने रिकामी न केल्यास आत असलेल्या लोकांचे मृत्यू होणार, लोकांना बाहेर काढा नाहीतर, हात-पाय उडतील.
आम्ही 'रोडकिल' आणि 'क्यो' या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहोत. हा मेसेज मीडिया हाऊसना द्या असा धक्कादायक मजकूर होता. हा मेल ३० जून २०२५ रोजीला सकाळी ११.५० वाजता आला असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या मेलची माहिती मिळताच शाळेच्या प्राचार्या अपूर्वा पाटील यांनी जबाबदारीने तात्काळ चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याच्या लँडलाईनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक, तसेच अँटी टेररिस्ट सेल (ATC) व गुप्त विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यासोबतच बॉम्ब शोध व निकामी करणारे पथक (BDDS) देखील पाचारण करण्यात आले. बीडीडीएस अधिकारी डिओ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शाळेच्या संपूर्ण इमारतीची कसून तपासणी केली.
या तपासणीनंतर बीडीडीएस पथकाने लेखी प्रमाणपत्र देऊन शाळा परिसरात कोणतीही स्फोटके किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याचे स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान पोलिसांकडून दोन अधिकारी आणि १२ अंमलदारांचा बंदोबस्त शाळेसमोर ठेवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चतु:श्रृंगी पोलिसांनी हद्दीतील डीएव्ही पब्लिक स्कूल, औंध आणि लॉयला स्कूल, पाषाण रोड या शाळांना भेट देऊन प्राचार्यांना अतिरिक्त सतर्कतेच्या सूचना दिल्या. हा धमकीचा मेल ‘roadkillkyo’ नावाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला असून, तो कोणी पाठवला, यामागे नेमके कोणते नेटवर्क कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कायदेशीर पावले उचलली जात आहेत. या घटनेमुळे शाळा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी, शाळा प्रशासनाने दाखवलेली दक्षता आणि पोलिसांची तत्पर कारवाई यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.