Pune Crime: शिरूर तालुक्यात उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून अफूची शेती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:02 IST2026-04-12T14:02:25+5:302026-04-12T14:02:35+5:30
- उसाच्या शेतात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले.

Pune Crime: शिरूर तालुक्यात उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून अफूची शेती
शिक्रापूर : केंदूर (ता. शिरुर) येथील थिटेमळा येथे उसाच्या शेतात बेकायदेशीरपणे आंतरपीक म्हणून अफूची शेती पिकवणाऱ्या शेतीवर शिक्रापूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकत दोन लाख साठ हजार रुपयांचा अफू जप्त केला. केंदूर येथील थिटेमळा येथे येथे एका इसमाने उसाच्या शेतात बेकायदेशीरपणे अफूचे पीक पिकविले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांना मिळाली.
त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, सहायक पोलिस उपनिरीक्षक धनंजय थेऊरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, तुषार पंदारे यांनी सदर ठिकाणी जात शेतात पाहणी केली असता उसाच्या शेतात बेकायदेशीरपणे विक्रीसाठी अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा करत शेतातील तब्बल दोन लाख साठ हजार रुपये किमतीची अफूची दोनशे तीस झाडे जप्त केली आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार जनार्दन सुरेश शेळके (वय ४३, रा. शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली असून शेत मालक काळूराम दशरथ थिटे (वय ६६, रा. जांभळावस्ती केंदूर, ता. शिरुर) या इसमावर गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे करीत आहेत.