बनावट ई-मेलवरून साडेसहा कोटींची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 07:49 IST2025-04-25T07:47:49+5:302025-04-25T07:49:19+5:30
जैन यांच्या इ-मेलवर दोन वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून मेल पाठवले गेले.

बनावट ई-मेलवरून साडेसहा कोटींची ऑनलाइन फसवणूक; सायबर पोलिस ठाण्यात झाला गुन्हा दाखल
पुणे : बनावट ई-मेल आयडी वापरून कोंढवा येथील उद्योजकाची साडेसहा कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी अज्ञात ई-मेल आयडी धारकाविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश अशोककुमार जैन (३९, रा. क्लोअर हायलँड, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. २७ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
जैन यांच्या इ-मेलवर दोन वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून मेल पाठवले गेले. या बनावट ई-मेल खात्यांमधून सिटी बँक आणि सिटीझन्स बँकेच्या अधिकृत प्रतिनिधींच्या नावाने संपर्क साधण्यात आला. त्यांनी बँकेच्या खात्यावर अनुक्रमे ४,२३,२०३ यूएसडी डॉलर (अंदाजे ३ कोटी ६२ लाख रुपये) आणि ३,३४,५४० यूएसडी डॉलर (अंदाजे २ कोटी ८८ लाख रुपये) जमा करण्याची मागणी केली.
या खोट्या ई-मेल मधील विश्वासार्ह भाषाशैली आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे जैन यांनी पैसे ट्रान्सफर केले. मात्र, नंतर यातील काही व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये आणि फसवणुकीच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.