बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:41 IST2025-06-25T18:41:31+5:302025-06-25T18:41:45+5:30

गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

PUNE CRIME One robbed at gunpoint in Bopodi; Three cases of forced theft filed | बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

बोपोडीत शस्त्राचा धाक दाखवून एकास लुटले; जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल

पुणे : शहरातील बोपोडी, औंध रोड आणि येरवडा परिसरात जबरी चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत चतु:शृंगी, येरवडा आणि खडकी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तिन्ही घटनांत रस्त्यावरून निघालेल्या तरुणांकडील मोबाइल आणि इतर ऐवज चोरट्यांनी हिसकावला आहे.

गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून तरुणाचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावला. ही घटना १७ जून रोजी औंध येथील स्पायसर महाविद्यालयासमोरील रस्त्यावर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. याबाबत तन्वीर सय्यद (२६, रा. खडकी) यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ जून रोजी दुपारी पावणे तीनच्या सुमारास फिर्यादी स्पायसर कॉलेजसमोरील रस्त्यावरून चारचाकीतून निघाले होते. तेव्हा आरोपींनी गाडीचा धक्का लागल्याचा बहाणा करून फिर्यादीला थांबवले. त्यानंतर धक्काबुक्की करून फिर्यादीच्या हातातील ६० हजारांचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून चोरून भरधाव वेगात निघून गेले. याबाबत सय्यद यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

दोघा चोरट्यांनी मोबाइल हिसकावून पळ काढला

घटनेत व्हिडीओ कॉलवर पत्नीशी बोलत असताना तरुणाच्या हातातील मोबाइल दोघा चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. ही घटना सोमवारी (दि. २३) सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास घडली. याबाबत ओमकार खेळगे (२७, रा. टिंगरेनगर) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, फिर्यादी हे मूळचे लातूर येथील आहे. सोमवारी सायंकाळी सव्वानऊच्या सुमारास ते आपल्या पत्नीशी व्हिडीओ कॉलवर बोलत येरवडा येथील कॉमर झोन परिसरातून पायी निघाले होते. तेव्हा दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे त्यांच्या उजव्या बाजूने आले. त्यांनी फिर्यादीच्या हातातील मोबाइल हिसकावून कॉमर झोनच्या दिशेने निघून गेले. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी आडवी घालून थांबवले अन् शस्त्राच्या धाकाने लुटले...

चारचाकीमधून निघालेल्या एकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत उमेश पाटील (२७, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, मंगळवारी (दि. २४) दुपारी साडेबाराच्या सुमारास फिर्यादी हे चारचाकी वाहनातून निघाले होते. बोपोडी मेट्रो स्थानकाखाली दोघा दुचाकीस्वारांना त्यांच्या चारचाकीला दुचाकी आडवी घालून थांबवले, तसेच दुचाकीला कट का मारला? अशी विचारणा करून फिर्यादी यांना हाताने मारहाण केली, तसेच चाकूचा धाक दाखवून दहशत माजवली. त्यानंतर फिर्यादी यांच्या कानातील दीड ग्रॅम वजनाची बाळी चोरून तिथून निघून गेले. पोलिस उपनिरीक्षक फाटे तपास करत आहेत.

धक्का मारून हातचलाखीने रोकड चोरली

लघुशंकेसाठी थांबलेल्या तरुणाला धक्का मारून तुम्हाला काय लागले का? असे म्हणून हातचलाखीने २० हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्याने चोरी केली. याप्रकरणी अहिल्यानगर येथील अरबाज खान (२७) या तरुणाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार सोमवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास पुणे-अहिल्यानगर रोडवर चंदननगर परिसरात घडला. खान हा कारने सहकाऱ्यांसोबत निघाला होता. लघुशंकेसाठी तो चंदननगर परिसरात थांबला असता, आरोपीने धक्का देऊन हातचलाखीने त्याच्या खिशातील रोकड चोरी केली.

Web Title: PUNE CRIME One robbed at gunpoint in Bopodi; Three cases of forced theft filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.