Pune Crime : रात्रीची होम व्हिजिट, चाकूचा धाक अन् डॉक्टरांची लूट; सहकारनगर पोलिसांकडून दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 11:06 IST2026-01-24T11:04:56+5:302026-01-24T11:06:10+5:30
दोन अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरांना फोन करून आई आजारी असल्याने तपासणीसाठी होम व्हिजिट द्यावी, अशी विनंती केली.

Pune Crime : रात्रीची होम व्हिजिट, चाकूचा धाक अन् डॉक्टरांची लूट; सहकारनगर पोलिसांकडून दोघे अटकेत
सहकारनगर : सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरला लुटणाऱ्या दोन आरोपींना सहकारनगर पोलिसांनी अटक करून गुन्ह्याची उकल केली आहे. गौरंग किरण देसाई (वय २५, व्यवसाय कॉल सेंटर, रा. कात्रज) व शुभम उमेश शिंदे (वय २८, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १ जानेवारी रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी डॉक्टरांना फोन करून आई आजारी असल्याने तपासणीसाठी होम व्हिजिट द्यावी, अशी विनंती केली. पुणे – सातारा रोडलगत असलेल्या अथर्व फरिहाज बिल्डिंग, होंडा शोरूमजवळ डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टर तेथे पोहोचताच अंधाराचा फायदा घेत आरोपींनी चाकूचा धाक दाखवून त्यांना लुटले.
आरोपींनी डॉक्टरांची बीएमडब्ल्यू मोटारसायकल, मोबाइल फोन, बॅगमधील चांदीचा जग व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५० हजार २०० रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी डॉक्टरांच्या फिर्यादीवरून सहकारनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करून आरोपींकडून बीएमडब्ल्यू मोटारसायकल, मोबाइल फोन, रोख रक्कम व चांदीचा जग असा एकूण ४ लाख २१ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
तपासात आरोपींनी गुन्ह्यासाठी इतर राज्यांतील मोबाइल फोन व सीमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. सुनियोजित पद्धतीने करण्यात आलेल्या या क्लिष्ट गुन्ह्याची उकल सहकारनगर पोलिसांनी यशस्वीपणे केली आहे.
या कामगिरीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर पोलिस उपनिरीक्षक गणेश कर्चे, पोलिस उपनिरीक्षक सद्दाम फकीर, तसेच पोलिस अंमलदार बापूसाहेब खुटवड, अमोल पवार, चंद्रकांत जाधव, किरण कांबळे, नीलेश शिवतारे, अभिमान बागलाने, सागर सुतकर, आकाश किर्तीकर, अमित पदमाळे, महेश भगत, योगेश ढोले, मारुती नलवाड व रफिक तडवी यांनी सहभाग घेतला.