लग्नासाठी मुलींना बनावट दस्तऐवजांसह फसवणूक करणाऱ्या महिलांचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 20:04 IST2025-10-15T20:04:35+5:302025-10-15T20:04:59+5:30
पोलिस तपासात हे समोर आले की, माहेर संस्थेच्या नावाखाली मुली उपलब्ध करून देण्याचा दावा करून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.

लग्नासाठी मुलींना बनावट दस्तऐवजांसह फसवणूक करणाऱ्या महिलांचा पर्दाफाश
शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांच्या विशेष पथकाने लग्नासाठी मुली देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलांची छाननी करून संशयित महिलांना जेरबंद केले आहे. या प्रकरणात, महिला माहेर संस्थेच्या माध्यमातून बनावट प्रमाणपत्रे दाखवून लोकांकडून पैसे घेऊन फसवणूक केली जात होती. पोलिस तपासात हे समोर आले की, माहेर संस्थेच्या नावाखाली मुली उपलब्ध करून देण्याचा दावा करून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांच्या माहितीप्रमाणे, नारायण शिरोडकर हे त्यांच्या भाच्यासाठी लग्नाला मुलगी शोधत असताना एका महिलेकडून ऑनलाइन पैसे घेऊन फसवले गेले. संशयित महिलांनी लुसी कुरियन यांनी स्थापन केलेल्या माहेर संस्थेच्या माध्यमातून मुलगी उपलब्ध करून देणार असल्याचा दावा करून खोटे प्रमाणपत्र दिले होते.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांना अशीही माहिती मिळाली की, फसवणूक करणाऱ्या महिला चंद्रपूरमध्ये असून, त्या नागरिकांना माहेर संस्थेचे फोटो वापरून फसवणूक करीत आहेत. अजूनही काही गुन्हे उघड होण्याची मोठी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी सांगितले की, या महिलांनी माहेर संस्थेत लग्नासाठी मुली उपलब्ध असल्याचा दावा करीत बनावट बायोडेटा, फोटो आणि लग्नासाठी रजिस्ट्रेशन तसेच कोर्ट मॅरेज संदर्भातील कागदपत्रे तयार करून पैसे घेत आहेत.
ही माहिती मिळाल्यानंतर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस हवालदार महेंद्र पाटील, उद्धव भालेराव, महिला पोलिस शिपाई रूपाली निंभोरे आणि संध्या शिंदे यांनी माहेर संस्थेचे अधीक्षक शीलानंद अंभोरे यांच्या सहकार्याने थेट चंद्रपूर येथे जाऊन संशयित महिलांना ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीदरम्यान संशयित महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली.
न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी :
जेरबंद करण्यात आलेल्या महिलांमध्ये सपना भाउराव पोडे (वय २६, रा. विसापूर, ता. बल्लारशाह, जि. चंद्रपूर), प्रियंका नितेश जांगळे (वय ३३, रा. पंचशील चौक, दुर्गापूर, जि. चंद्रपूर), भूमिका सुरेश सौंदरकर (वय २४, रा. सुमित्रानगर, तुकुम, जि. चंद्रपूर), प्रांजली सुभाष सुखदेवे (वय २०, रा. सालोरी, येन्सा ब्लॉक, पोस्ट चिनोरा, ता. वरोरा, जि. चंद्रपूर) आणि आचल आशिष बोरेवार (वय २५, रा. हनुमाननगर, तुकुम, जि. चंद्रपूर) यांचा समावेश आहे. सर्व महिलांना शिरूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेंद्र पाटील करीत आहेत.