Video : वय २०, गुन्हे २२; ७० वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुलतानची पुणे पोलिसांनी काढली धिंड
By किरण शिंदे | Updated: March 2, 2026 11:44 IST2026-03-02T11:42:56+5:302026-03-02T11:44:41+5:30
- अवघ्या २० व्या वर्षी २२ गुन्ह्यांची नोंद असलेल्या या आरोपीची पुणे पोलिसांनी जाहीर धिंड काढत कडक कारवाई केली आहे

Video : वय २०, गुन्हे २२; ७० वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुलतानची पुणे पोलिसांनी काढली धिंड
पुणे - सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडिओत हातात हथकडी, दोरखंडाने जखडलेला आणि पोलिसांच्या कड्या सुरक्षा व्यवस्थेतून नेला जाणारा हा तरुण म्हणजे सुलतान रेहमान शेख. अवघ्या २० व्या वर्षी २२ गुन्ह्यांची नोंद असलेल्या या आरोपीची पुणे पोलिसांनी जाहीर धिंड काढत कडक कारवाई केली आहे.
येरवडा परिसरातील लक्ष्मी नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुलतान शेख याच्याविरुद्ध वाहन तोडफोड, दहशत निर्माण करणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. नव्याने स्थापन झालेल्या लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार वाहनांची तोडफोड होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपासादरम्यान एका तोडफोडीच्या प्रकरणात सुलतानचे नाव पुढे आले. चौकशीत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आणि पोलिसांच्या नोंदीप्रमाणे त्याच्यावर तब्बल २२ गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
७० वाहनांची तोडफोड; पोलिसांचा ‘सिंघम’ अॅक्शन
पोलीस कोठडीत सखोल चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. सुलतानने एक-दोन नव्हे, तर तब्बल ७० वाहनांची तोडफोड केल्याची कबुली दिल्याचे समजते. यानंतर लक्ष्मी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र कदम यांनी कठोर भूमिका घेत त्याची जाहीर धिंड काढली. ज्या भागात तो स्वतःचा दबदबा निर्माण करत होता, त्याच परिसरातून पोलिसांनी त्याला खेचत नेले. “गुंडगिरीला घाबरायचे नाही,” असा स्पष्ट संदेश देत पोलिसांनी स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस आयुक्तांचे कडक आदेश
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आधीपासूनच कडक पावले उचलली आहेत. अनेक कुख्यात गुंडांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. मात्र, काही स्वयंघोषित गुंडांकडून वेगवेगळ्या भागांत तोडफोडीच्या घटना सुरूच असल्याने पोलिसांना अशा कठोर उपाययोजना कराव्या लागत आहेत. हडपसर, काळेपडळ आणि बिबवेवाडी परिसरातही यापूर्वी अशाच घटना घडल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधितांना धडा शिकवला होता. तरीही काही ठिकाणी गुन्हेगारीचे डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.
नागरिकांमध्ये समाधान, गुंडांना इशारा
या कारवाईनंतर लक्ष्मी नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे गल्लीबोळातील स्वयंघोषित ‘भाईंना धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.