Pune Crime : शिरूरमधून जप्त केलेल्या अमलीपदार्थांचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 19:36 IST2026-01-27T19:36:06+5:302026-01-27T19:36:24+5:30
अहिल्आनगरमधील श्रीरामपूर पाेलिसांनी मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी येथे कारवाई करून एका टेम्पाेमधून १३ काेटी ७५ लाख रुपयांचा अल्प्राझाेलम हा अमलीपदार्थ जप्त केला हाेता.

Pune Crime : शिरूरमधून जप्त केलेल्या अमलीपदार्थांचे धागेदोरे अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत
पुणे : ग्रामीण पाेलिसांनी शिरूर शहरातील एका गॅरेजचालकाच्या ताब्यातून एक किलाे ५२ ग्रॅम एमडी अमलीपदार्थ जप्त केल्याच्या प्रकरणात अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलातील पोलिस हवालदाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पुणे ग्रामीण पाेलिसांनी आतापर्यंत शादाब शेख (रा. शिरूर, पुणे), पोलिस कर्मचारी शामसुंदर गुजर (रा. अहिल्यानगर), ऋषिकेश प्रकाश चित्तर (रा. कुरुंद, ता. पारनेर, अहिल्यानगर), महेश गायकवाड (श्रीगाेंदा, अहिल्यानगर), ज्ञानदेव शिंदे (रा. अहिल्यानगर) या आराेपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील दुचाकीसह कारदेखील जप्त करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पाेलिसांनी शिरूर शहरातील एका गॅरेजचालकाच्या ताब्यातून एक किलाे ५२ ग्रॅम एमडी अमलीपदार्थ जप्त केल्याचा प्रकार १८ जानेवारी राेजी घडला. मात्र, फाॅरेन्सिक प्रयाेगशाळेच्या चाैकशीत संबंधित अमली पदार्थ हे मेफेड्राेन नाहीतर झाेपेच्या गाेळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा अल्प्राझाेलम हा पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे याबाबत गॅरेजचालक शादाब रियाज शेख याच्याकडे सखाेल चाैकशी केल्यावर त्याने अहिल्यानगर येथील एलसीबी पथकात अमलीपदार्थ विराेधी विभागात काम करणारा पोलिस कर्मचारी श्यामसुंदर गुजर याच्यासह इतर तीन जणांची नावे घेतली. तांत्रिक चाैकशीआधारे संबंधित पाेलिस कर्मचाऱ्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याच्यासह चार आरोपींना पुणे ग्रामीण पाेलिसांच्या एलसीबी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे १० काेटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या अल्प्राझाेलम हा १० किलाे ७०० ग्रॅम पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अहिल्आनगरमधील श्रीरामपूर पाेलिसांनी मे २०२५ मध्ये श्रीरामपूर एमआयडीसी येथे कारवाई करून एका टेम्पाेमधून १३ काेटी ७५ लाख रुपयांचा अल्प्राझाेलम हा अमलीपदार्थ जप्त केला हाेता. हा मुद्देमाल जप्त केलेला असताना, संबंधित मुद्देमालच पाेलिस कर्मचारी गुजर याने चाेरी करून त्याची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात पोलिस हवालदारासह आत्तापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० किलो ७०७ ग्रॅम वजनाचा अल्प्राझोलम नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. त्याची अंदाजे किंमत २५ ते ३० कोटी आहे. - संदीपसिंह गिल, पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण