सासवड पोलिस ठाण्यातील बिंगो चक्री प्रकरणातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 16:29 IST2025-12-17T16:26:53+5:302025-12-17T16:29:49+5:30
- आठ महिन्यांच्या चौकशीनंतर एसपींची कारवाई; आणखी कर्मचारी रडारवर

सासवड पोलिस ठाण्यातील बिंगो चक्री प्रकरणातील वादग्रस्त कर्मचाऱ्याचे अखेर निलंबन
सासवड : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी बेजबाबदार व गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत सासवड पोलिस ठाण्यातील वादग्रस्त पोलिस हवालदार विजय जावळे याला निलंबित केले आहे. तब्बल आठ महिन्यांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, निलंबनाचा आदेश मिळताच संबंधित हवालदारास मुख्यालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २८ मार्च २०२५ रोजी सासवड पोलिसांनी बिंगो चक्री जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकला होता. या कारवाईत जप्त करण्यात आलेले साहित्य पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, मोठ्या प्रमाणावर आर्थिक तडजोड करून जप्त केलेले साहित्य परत देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे, तसेच स्टेशन डायरीमध्ये ‘टीव्ही दुरुस्तीचे काम सुरू असल्याची’ नोंद करून प्रकरण कायमस्वरूपी दाबण्यात आल्याचे समोर आले.
दरम्यान, या जुगार अड्ड्यावरील पोलिस हवालदार विजय जावळे यांचे सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये जावळे हे जुगार अड्ड्यावर येऊन मटका लावताना, तसेच जिंकलेले पैसे घेताना स्पष्टपणे दिसून येत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित कर्मचारी काही दिवस अनुपस्थित असल्याचेही निदर्शनास आले.
यानंतर भोर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून जावळे यांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. चौकशीअंती कसुरी अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी गैरवर्तनाचा ठपका ठेवत जावळे यांच्या निलंबनाचा आदेश दिला.
सासवड पोलिस ठाण्यात निलंबनांची मालिका
सासवड पोलिस ठाण्यात मागील काही महिन्यांपासून निलंबनाची मालिका सुरू आहे. बेकायदेशीर धंद्यांतून मिळणाऱ्या ‘मलई’वरून अंतर्गत वाद, एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा आहे. यापूर्वी पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक व काही कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातही एका कर्मचाऱ्याचे निलंबन करण्यात आले असून, अपघातानंतर मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सध्या हे सर्व कर्मचारी मुख्यालयात कार्यरत आहेत.
आणखी दोन ते तीन कर्मचारी रडारवर
सासवड पोलिस ठाण्यातील कारवाई येथेच थांबणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. बेकायदेशीर धंद्यांना पाठबळ देणे, फिर्यादीस आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे, तसेच बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांना पोलिस कारवाईची आगाऊ माहिती देणे, अशा विविध आरोपांखाली आणखी दोन ते तीन कर्मचारी वरिष्ठांच्या रडारवर असल्याचे समजते. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.