हरवलेला मोबाईल परत मिळाला; पुणे पोलिसांनी दिले ४१ मोबाईल परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:54 IST2025-08-16T18:53:39+5:302025-08-16T18:54:48+5:30
मोबाईल हरवल्यास काय करावे? पोलिसांनी आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास नागरिकांनी खालील प्रक्रिया करावी

हरवलेला मोबाईल परत मिळाला; पुणे पोलिसांनी दिले ४१ मोबाईल परत
पुणे - शहरातील नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून परत करण्याची मोहिम पुणे पोलिसांकडून सातत्याने राबवली जाते. स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून शिवाजीनगर पोलिसांनी तब्बल ५ लाख रुपये किमतीचे ४१ मोबाईल संबंधित मालकांच्या ताब्यात परत दिले.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील गहाळ मोबाईलचा डेटा तयार करण्यात आला होता. त्यानंतर तांत्रिक तपासादरम्यान हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये तसेच परराज्यात वापरात असल्याचे निष्पन्न झाले. शिवाजीनगर पोलिसांनी त्या त्या जिल्ह्यातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून सर्व मोबाईल हस्तगत केले.
या सर्व मोबाईलची एकत्रित किंमत जवळपास ५ लाख रुपये इतकी आहे. स्वातंत्र दिनाच्या दिवशी पोलिसांनी या मोबाईलचे मूळ मालकांना परत देऊन नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला.
मोबाईल हरवल्यास काय करावे?
पोलिसांनी आवाहन केले आहे की, मोबाईल हरवल्यास नागरिकांनी खालील प्रक्रिया करावी :
पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर (punepolice.gov.in/LostFoundReg) जाऊन तक्रार नोंदवावी. तक्रारीची प्रिंट काढून ती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये द्यावी. मोबाईलसाठी नवीन सिमकार्ड घ्यावे व ते चालू करावे. त्यानंतर CEIR पोर्टलवर (www.ceir.gov.in) नोंदणी करून मोबाईल ब्लॉक/ट्रॅक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
तक्रारीची प्रत, मोबाईल खरेदीची पावती व ओळखपत्राची PDF अपलोड करून, मोबाईलवर आलेला OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करावी. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून त्वरित कारवाई करावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे."