खडकी येथील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:09 IST2025-10-01T10:07:11+5:302025-10-01T10:09:16+5:30
- आरोपींनी आठ महिलांकडून हा व्यवसाय करवून घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

खडकी येथील आनंद लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक
दौंड : खडकी (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गालगत असलेल्या आनंद लॉज अँड बार येथे अवैध वेश्या व्यवसायप्रकरणी पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या कारवाईत लॉज चालक प्रभाकर शेट्टी आणि स्वप्निल गुणवरे (दोघेही रा. खडकी, ता. दौंड) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
पोलिसांना खडकी गावच्या हद्दीतील आनंद लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवारी (दि. २७ सप्टेंबर) मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा टाकला. या कारवाईदरम्यान, लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. आरोपींनी आठ महिलांकडून हा व्यवसाय करवून घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांनी या सर्व महिलांची सुटका करून त्यांना बारामती येथील एका वसतिगृहात दाखल केले आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती विभागाचे अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, पोलिस निरीक्षक महेश मेश्राम आणि पोलिस हवालदार संजय कोठावळे यांच्यासह पोलिस पथकाने यशस्वीपणे पार पाडली.