अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 20:56 IST2025-09-04T20:55:06+5:302025-09-04T20:56:55+5:30
- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी

अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त
पुणे : साथीदारासह रिक्षात बसून अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाला पकडून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने रिक्षासह ७ लाखांचा माल हस्तगत केला आहे. मुजम्मील वाजीद खान (२५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून ५ लाख ३३ हजार रुपयांचा २६ ग्रॅम एमडी, १५ हजारांचे दोन मोबाईल, दीड लाखांची रिक्षा असा ६ लाख ९८ हजारांचा माल जप्त केला आहे.
अमली पदार्थ विरोधी पथक २ सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत असताना नशेमन बिल्डिंगसमोरील रोडवर एका रिक्षात मुजम्मील खान हा साथीदारासह बसला होता. ते कोणाची तरी वाट पाहत असल्याचे दिसले. पोलिस आणि आरोपींचे एकमेकांकडे लक्ष जाताच मुजम्मीलचा साथीदार हा वेगाने सिंहगड गॅरेज चौकाकडे पळून गेला. पोलिसांनी मुजम्मील खान याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सापडले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने साथीदाराने एमडी विक्री करता दिल्याचे सांगितले. त्याच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, एपीआय अनिल सुरवसे, पीएसआय दिगंबर कोकाटे, पोलिस कर्मचारी विशाल दळवी, मारुती पारधी, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रवीण उत्तेकर, संदिप शिर्के, विनायक साळवे, सर्जेराव सरगर, सुहास डोंगरे, दयानंद तेलंगे, विपुन गायकवाड, दत्ताराम जाधव, रेहाना शेख, खडक पोलिस ठाण्यातील पीएसआय कांबळे, पोलिस अंमलदार पांडुळे यांनी केली.