आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणारा सराईत स्थानबद्ध;समर्थ पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:59 IST2025-12-05T18:59:15+5:302025-12-05T18:59:29+5:30
कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची कोमकर आणि गायकवाड टोळीने सप्टेंबर २०२४ मध्ये हत्या केली होती.

आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणारा सराईत स्थानबद्ध;समर्थ पोलिसांची कारवाई
पुणे - आंदेकर टोळीचे इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून गुन्हेगारांचे उदात्तीकरण करणाऱ्या एका सराईतावर समर्थ पोलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत अधिनियम, १९८१ (एमपीडीए) स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
मंथन सचिन भालेराव (१९, रा. भवानी पेठ) असे पोलिसांना स्थानबद्ध केलेल्या सराईताचे नाव आहे. कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची कोमकर आणि गायकवाड टोळीने सप्टेंबर २०२४ मध्ये हत्या केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर वनराजच्या हत्येत पिस्तूल पुरवणारा आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचाही आंदेकर टोळीने खून केला आहे. दरम्यान, गुन्हेगारी टोळीविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलिसांनी आंदेकरला मोक्का लावला. तसेच त्यांना विविध मार्गाने साथ देणाऱ्या व मदत करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
मंथन भालेराव याने आंदेकर टोळीचे उदात्तीकरण करणारे स्टेटस त्याच्या इन्स्टाग्राह अकाउंटवर ठेवले होते. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. समर्थ पोलिस स्टेशनची मागील काही महिन्यांतील ही पाचवी कारवाई आहे.