बाणेरमधील शेतातील ‘हुक्का पार्लर’चा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:52 IST2025-11-11T17:50:07+5:302025-11-11T17:52:40+5:30
- औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील शेतात ‘फार्म कॅफे’ असून, तेथे बेकायदा हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली.

बाणेरमधील शेतातील ‘हुक्का पार्लर’चा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त
पुणे : बाणेर भागातील एका शेतात बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी हुक्कापात्र, सुगंधी तंबाखू असा ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित हुक्का पार्लरचा मालक, शेत जमिनीचा मालक, व्यवस्थापकासह कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
‘फार्म कॅफे’चा मालक अमित वाळके (रा. औंध), व्यवस्थापक बलभीम कोळी, चालक विक्रम कुमार द्वारका प्रसाद गुप्ता (२३), कर्मचारी सूरज संजय वर्मा (२४), राजकुमार चन्नू अहिरवाल (१९, सर्व रा. औंध-बाणेर लिंक रस्ता, बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी वाघेश कांबळे यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंध-बाणेर लिंक रस्त्यावरील शेतात ‘फार्म कॅफे’ असून, तेथे बेकायदा हुक्का पार्लर चालविले जात असल्याची माहिती तपास पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी काचेचे २० हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा ४८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अश्विनी ननावरे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, पोलिस हवालदार बाबासाहेब दांगडे, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, वाघेश कांबळे, तुषार गिरंगे यांनी ही कारवाई केली.