सोन्या-चांदीसह १४ लाखांचा माल जप्त; घरफोडी करणाऱ्या चोरांचा पर्दाफाश; नारायणगाव येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:34 IST2025-11-14T18:34:14+5:302025-11-14T18:34:47+5:30
या चोरट्याने केलेल्या तीन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याने त्यांच्याकडून १६ तोळ्यांपर्यंत वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल अशा एकूण सुमारे १४,३७,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

सोन्या-चांदीसह १४ लाखांचा माल जप्त; घरफोडी करणाऱ्या चोरांचा पर्दाफाश; नारायणगाव येथील घटना
नारायणगाव : दिवाळीच्या ऐन काळात घरफोडी चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाला यशस्वीपणे अटक करण्यात आली आहे. या चोरट्याने केलेल्या तीन घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याने त्यांच्याकडून १६ तोळ्यांपर्यंत वजनाचे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटारसायकल अशा एकूण सुमारे १४,३७,६५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक महोदव शेलार आणि नारायणगावचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी दिली.
नारायणगाव पोलिस ठाण्यात दि. १४/१०/२०२५ रोजी एक गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी विष्णू भागूजी सांगडे (वय ६२ वर्षे), रा. वैभवलक्ष्मी सोसायटी, विटेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे यांनी तक्रार दिली की त्यांच्या राहत्या घराला कुलूप लावून ते काकडा आरतीसाठी नारायणगाव येथील मंदिरात गेले होते. त्याच दरम्यान, पहाटे साडेचार ते सहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाटातून सुमारे ११ लाख २० हजार रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी करून नेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अमलदार अक्षय नवले यांना गोपनीय श्रोत्याकडून असे कळाले की, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल सीबीझेड क्रमांकाची आहे आणि ती विशाल दत्तात्रय तांदळे वापरत आहे. विशाल मुळाकाकडे राहणारा असून सध्या (रा. मंचर, ता. आंबेगाव) येथे आहे. तो हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि त्याच्यावर यापूर्वी मालमत्ता चोरीचे एकूण २८ गुन्हे नोंदलेले आहेत. या गुन्ह्यातही त्याच्याच सहभाग आहे, असे समजले.
विशाल तांदळे नारायणगाव परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने सापळा रचून त्याला सीबीझेड मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीत त्याने नारायणगाव आणि जुन्नर येथील घरफोडी चोरीचं कबूल केले. त्याच्याकडून चोरीस गेलेले १६ तोळे सोन्याचे दागिने, ८४१ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा सुमारे १४ लाख ३७ हजार ९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून पुढील तपास सुरू आहे.