वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 21:19 IST2025-10-30T21:18:41+5:302025-10-30T21:19:41+5:30
त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली

वानवडी परिसरात टोळक्याचा राडा, वाहनांची केली तोडफोड;तरुणावर वार
पुणे : दुचाकीवरुन आलेल्या टोळक्याने तरुणाला अडवून वार करत गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास वानवडी परिसरातील शिंदे वस्तीवरील एस.आर.ए इमारतीच्या मुख्य गेटजवळ घडली.
याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, इतरांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एस. सचिन कांबळे (२०, रा. शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ४४ वर्षीय तक्रारदाराने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिंदे वस्ती परिसरात थांबले असताना, दुचाकीस्वार सहा जणांनी त्यांना गाठले. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी इमारतीखालील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर परिसरात आरडाओरड करत शांतता भंग केली. याप्रकरणी कांबळेला अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने घेतला जात आहे. पोलिस उपनिरीक्षक धनाजी टोणे पुढील तपास करत आहेत.