५ लाख रुपयांच्या ऑनलाइन लोनच्या नावाखाली २७ हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:00 IST2025-10-15T17:59:19+5:302025-10-15T18:00:37+5:30
५ लाख रुपयांच्या लोनसाठी २३ हजार ८१४ रुपयांची प्रोसेसिंग फी भरण्याचे प्रलोभन दाखवले आणि ती फी फिर्यादीच्या खात्यावर पाठवून ५.२५ लाखांचे लोन मंजूर करून देतो

५ लाख रुपयांच्या ऑनलाइन लोनच्या नावाखाली २७ हजारांची फसवणूक
पिंपरी : व्हॉट्सॲप आणि फोनकॉलद्वारे संपर्क साधून लोन मंजूर करून देतो असे सांगून एका व्यक्तीकडून कागदपत्रे घेतली आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाने २७ हजार रुपयांचे लोन घेतले. तसेच, ५ लाख रुपयांच्या लोनसाठी प्रोसेसिंग फीच्या नावाखाली २३ हजार ८१४ रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगून एकूण ३० हजार ५९१ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. ही घटना ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत फुगेवाडी, दापोडी येथे ऑनलाइन घडली.
करण विशनसिंग राजपुरोहित (३३, फुगेवाडी, दापोडी) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने फिर्यादीच्या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्सॲप आणि फोनकॉलद्वारे संपर्क साधून आपण किशोर पाटील बोलत असल्याचे सांगितले. त्याने लोन मंजूर करून देतो असे सांगून फिर्यादीकडून लोन मंजुरीसाठी लागणारी कागदपत्रे घेतली. त्यानंतर आरके बन्सल फायनान्स कंपनीचे फिर्यादीच्या नावाने त्यांच्या संमतीशिवाय २७ हजार रुपयांचे लोन घेतले.
५ लाख रुपयांच्या लोनसाठी २३ हजार ८१४ रुपयांची प्रोसेसिंग फी भरण्याचे प्रलोभन दाखवले आणि ती फी फिर्यादीच्या खात्यावर पाठवून ५.२५ लाखांचे लोन मंजूर करून देतो, असे सांगितले. त्याने फिर्यादीला ती २३ हजार ८१४ रुपयांची प्रोसेसिंग फी एका अनोळखी स्कॅनरवर पाठवायला लावून फिर्यादीची आरके बन्सल फायनान्स कंपनीच्या लोनसाठीचे चार्जेससहित एकूण ३० हजार ५९१ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली आहे.