हल्लेखोरांनी कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू, आई-वडील, बहीण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 13:16 IST2025-03-06T13:06:02+5:302025-03-06T13:16:14+5:30
११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण

हल्लेखोरांनी कुटुंबावर केला जीवघेणा हल्ला; तरुणाचा मृत्यू, आई-वडील, बहीण गंभीर जखमी
पुणे - यवत स्टेशन रोडवरील नीलकंठेश्वर मंदिराच्या मागे असलेल्या शशिकांत चव्हाण यांच्या घरात मध्यरात्री घडलेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. काल (दि. ५) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तीन चड्डी-बनियनधारी हल्लेखोरांनी घरात घुसून कुटुंबावर बेदम मारहाण केली. या हल्ल्यात अविनाश ऊर्फ विश्वजीत शशिकांत चव्हाण याचा मृत्यू झाला असून, शशिकांत चव्हाण, प्राची यादव आणि उज्वला चव्हाण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेचा थरार
हल्लेखोरांनी प्रथम घराबाहेर आलेल्या अविनाश चव्हाण याच्यावर हल्ला केला. त्यानंतर घरात घुसून कुटुंबातील तिघांवर अमानुष मारहाण करण्यात आली. मात्र, मयत अविनाश याची पत्नी सारीका चव्हाण हिने आपल्या तीन वर्षांच्या मुलासह बाथरूममध्ये लपून जीव वाचवला. तिने तत्काळ शेजाऱ्यांना मदतीसाठी हाक दिली.
शेजारी अरुण मुळीक व संतोष मुळीक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या चाहुलीने हल्लेखोर पळून गेले. यानंतर दीपक मुळीक, लक्ष्मण मुळीक, प्रणव मुळीक आणि कुमार मुळीक यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते पसार झाले.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस आणि पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत श्वानपथक (डॉग स्क्वॉड) पाचारण केले आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामागे काही अन्य कटकारस्थान आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे यवत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.