मोझे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा;प्राध्यापक व ३ विद्यार्थी अटकेत, उत्तरपत्रिका २ लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 21:16 IST2025-06-03T21:03:32+5:302025-06-03T21:16:47+5:30
मोझे महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला, अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेतले जात होते.

मोझे महाविद्यालयात परीक्षा घोटाळा;प्राध्यापक व ३ विद्यार्थी अटकेत, उत्तरपत्रिका २ लाखांची रोकड जप्त
-सुरेश वांढेकर
वाघोली - अभियांत्रिकी महाविद्यालयात परीक्षेची वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना पेपर लिहू दिल्याप्रकरणी प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली. उत्तरपत्रिकेची ६ बंडल, २ लाख रुपये आणि कंट्रोल रूमची चावी जप्त करण्यात आली आहे. वाघोलीतील बायफ रोडवरील पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी एक प्राध्यापक, एक विद्यार्थी आणि इतर दोन साथीदार अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रा. प्रतीक किसन सातव (वय ३७), आदित्य यशवंत खिलारे (वय २०), अमोल अशोक नागरगोजे (वय १८) आणि अनिकेत शिवाजी रोडे (वय २०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स - २ या विषयाच्या उत्तरपत्रिकांची ६ बंडल, २ लाख ६ हजार रुपये आणि उत्तरपत्रिका ठेवलेल्या कंट्रोल रूमची चावी जप्त करण्यात आली आहे.
मोझे महाविद्यालयात परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना पेपर कठीण गेला, अशा विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडून १० ते १५ हजार रुपये घेतले जात होते. त्यांना रात्री पुन्हा पेपर लिहिण्याची संधी दिली जात होती. यासाठी खास चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयावर छापा टाकला.
त्यावेळी प्रा. प्रतीक सातव हे, दुपारी झालेल्या पहिल्या वर्षाच्या इंजिनिअरिंग मॅथेमॅटिक्स - २ या विषयाचा पेपर पुन्हा लिहिण्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पेपर लिहू देत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आणि त्यांच्या टीमने केली.
असा चालला होता मोझेमध्ये उद्योग
प्रा. प्रतीक सातव हा कॉलेजमधील इतर तीन विद्यार्थ्यांना हाताशी धरून हा उद्योग करत होता. आदित्य खिलारे हा या विद्यार्थ्यांना गोळा करून त्यांच्याकडून आधी पैसे घेत असे. त्यानंतर, कोणी नसताना पहाटेच्या सुमारास या मुलांना बोलावून त्यांच्याकडून पुन्हा पेपर लिहून घेत असे. अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे हे दोघेही आदित्यप्रमाणे याच कॉलेजचे वरिष्ठ वर्गातील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. हे दोघे कंट्रोल रूम बनावट चावीने उघडून, पैसे दिलेल्या विद्यार्थ्यांचे पेपर बंडलमधून शोधून देत असत. पेपर लिहून झाल्यावर, ते पुन्हा बंडलमध्ये ठेवण्याचे कामही ते करत होते. ज्यांच्याकडून आदित्यने पैसे घेतले होते, असे आठ विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांच्या विरोधात सार्वजनिक परीक्षा (आयोग साधनांचे प्रतिबंध) या कायद्यांतर्गत आणि अन्य विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.