कोयत्याने वार करताच एसटीत गोंधळ उडाला; प्रवासी रक्तबंबाळ,आरोपीला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 13:13 IST2025-08-01T13:01:58+5:302025-08-01T13:13:17+5:30
- पवन गायकवाड असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.

कोयत्याने वार करताच एसटीत गोंधळ उडाला; प्रवासी रक्तबंबाळ,आरोपीला पोलिसांनी केली अटक
बारामती - बारामतीहून इंदापूरच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसमध्ये आज शुक्रवारी (दि. ० १ ) सकाळी दहाच्या सुमारास प्रवाशावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. पवन गायकवाड असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीस ताब्यात घेतले आहे.
अधिकच्या माहितीनुसार, बारामती आगारातून निघालेल्या एसटी (क्र. एमएच ४ बीटी ३५६) मध्ये काटेवाडी येथील पालखी महामार्गावरील उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. बसमध्ये अचानक सुरू झालेल्या झटापटीमुळे एकच गोंधळ उडाला. यावेळी एसटी वाहक तिकीट काढण्यात व्यस्त असताना,अज्ञात युवकाने पवन गायकवाड याच्यावर कोयत्याने वार केले.
हल्ल्यामुळे जखमी अवस्थेत पवन गायकवाड जिवाच्या भीतीने बसमधून उतरून पळाला. दरम्यान, आरोपी युवकही विरुद्ध दिशेने पळून गेला. मात्र, गावातील काही युवक आणि प्रवाशांनी त्याचा पाठलाग करत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी तेथून जात असलेल्या वाचलंदनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी आणि काही वेळात पोहोचलेल्या बारामती पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
घटनेची माहिती मिळताच बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलीस निरीक्षक वैशाली पाटील आणि पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.दरम्यान, या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, सार्वजनिक वाहतुकीतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.