भिगवण हादरलं..! इलेक्ट्रिक वायर हलवायला सांगितलं अन् क्षणात तरुणाचा मृत्यू..; दोघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 19:31 IST2026-03-14T19:27:38+5:302026-03-14T19:31:05+5:30
विजेच्या खांबावर टाकलेला इलेक्ट्रिक वायरचा आकडा काढण्यास सांगितले असता, सौरभ म्हणाला की, त्याने कधी लाईटचा आकडा टाकला नाही किंवा काढला नाही आणि त्याला ते काम जमणार नाही.

भिगवण हादरलं..! इलेक्ट्रिक वायर हलवायला सांगितलं अन् क्षणात तरुणाचा मृत्यू..; दोघांवर गुन्हा दाखल
भिगवण : मदनवाडी (ता. इंदापूर)येथील सौरभ मच्छिंद्र कसबे याच्या मृत्यूप्रकरणी भावाच्या तक्रारीनुसार दोघांवर भिगवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ मार्च रोजी भादलवाडी (ता. इंदापूर) येथील बळीराजा ढाब्यावर काम करत असताना विजेचा धक्का लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
या संदर्भातील तक्रार रोहित मच्छिंद्र कसबे (रा. मदनवाडी-चौफुला, ता. इंदापूर) यांनी दिली आहे. तक्रारीत नमूद केले आहे की, तक्रारदाराचा भाऊ सौरभ मच्छिंद्र कसबे (वय २६ वर्षे, रा. मदनवाडी, ता. इंदापूर) याला विजेच्या खांबावर टाकलेला इलेक्ट्रिक वायरचा आकडा काढण्यास सांगितले असता, सौरभ म्हणाला की, त्याने कधी लाईटचा आकडा टाकला नाही किंवा काढला नाही आणि त्याला ते काम जमणार नाही. तरीही त्याला सांगण्यात आले की, केवळ इलेक्ट्रिक वायर धरून हलव म्हणजे आकडा खाली पडेल, असे सांगून संबंधित दोघांनी सौरभला निष्काळजीपणे व हलगर्जीपणे वायरचा आकडा काढण्यास सांगितले.
सौरभने इलेक्ट्रिकची वायर उजव्या हातात पकडून हलवली असता, आकडा पाडत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याच्या उजव्या हाताच्या बोटांना, छातीला व पाठीला भाजले. तो गंभीर जखमी झाला आणि त्याच्यावर सूर्य सह्याद्री हॉस्पिटल, कसबा पेठ, पुणे येथे उपचार सुरू असताना तो मयत झाला. या प्रकरणी संतोष उर्फ मुकेश पवार (रा. मदनवाडी, ता. इंदापूर) आणि बळीराजा ढाब्याचे मालक सागर खाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.