यशवंत कारखान्याच्या संचालकांवर आर्थिक गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 09:54 IST2025-11-08T09:53:40+5:302025-11-08T09:54:03+5:30
सभेच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये मृत सभासदांना जिवंत दाखवून त्यांच्या नावाने बनावट सह्या केल्याचा आरोप केला आहे.

यशवंत कारखान्याच्या संचालकांवर आर्थिक गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज
लोणी काळभोर : यशवंत सहकारी साखर कारखाना लि., थेऊर (ता. हवेली) येथील ५१२ कोटी रुपयांच्या मूल्याची ९९.२७ एकर जमीन संगनमताने व बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचा गंभीर आरोप यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीने केला आहे. या प्रकरणात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, तसेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकारी अशा ४४ जणांविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष तक्रारदार विकास सदाशिव लवांडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरम अपूर्ण असतानाही कामकाज पूर्ण झाल्याचे खोटे दाखविण्यात आले. सभेच्या उपस्थिती रजिस्टरमध्ये मृत सभासदांना जिवंत दाखवून त्यांच्या नावाने बनावट सह्या केल्याचा आरोप केला आहे. किशोर साळुंखे, राणू चौधरी, पांडुरंग आव्हाळे, तानाजी कोतवाल, बाळासाहेब कोतवाल, अण्णासाहेब कोतवाल, इतकेच नव्हे तर बिगर सभासद व संचालकांचे नातेवाईक यांनाही सभासद असल्याचे दाखवून त्यांच्याही सह्या केल्याचे आरोप तक्रारीत नमूद आहेत. शासनाची परवानगी न घेता व योग्य नोंदणी न करता नोटरी दस्त तयार करून ३६.५० कोटींची रक्कम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खात्यातून कारखान्याच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
‘सुभाष–प्रकाश जगताप बंधूंनी संगनमताने गुन्हा रचला’ केल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. तक्रारदारांनी सांगितले की, कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप आणि बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप हे सख्खे भाऊ असून, त्यांच्यासह काही संचालक व नातेवाईकांनी संगनमताने हा गैरव्यवहार रचला आहे. एकूण ४४ गैरअर्जदारांविरुद्ध चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कोट यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीतील कथित ५१२ कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, तसेच बनावट दस्तऐवज, रक्कम प्रवाह तपासून शासन महसुलाचे संरक्षण करावे, अशीही विनंती करण्यात आली आहे.
कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही सर्व कायदेशीररीत्या व्यवहार करत आहोत. पैसे बँक खात्यावर आले असून, सर्व हिशोब आहे. सभासद, शेतकरी, कामगार, सर्व पत्रकार व ज्यांनी आरोप केला आहे त्या सर्वांबरोबर मी समोरासमोर चर्चा करू शकतो. यामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचा अपहार करत नाही. मी कारखान्यासाठी स्वतःची गाडी, स्वतःचे डिझेल टाकून काम करणारा सर्वसामान्य चेअरमन आहे. केलेले आरोप तथ्यहीन आहेत. -सुभाष जगताप अध्यक्ष, यशवंत सहकारी साखर कारखाना, थेऊर