आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 14:26 IST2025-10-01T14:24:19+5:302025-10-01T14:26:14+5:30
बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली

आंदेकर टोळीच्या अडचणीत वाढ; समर्थ पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल
पुणे - कुख्यात आंदेकर टोळीचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांकडून पावली उचलली जात आहे..समर्थ पोलीस ठाण्यात या टोळीविरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात अनधिकृत बांधकाम आणि खंडणी मागणी या गंभीर प्रकरणांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१७ पासून आंदेकर टोळीने एका व्यावसायिकाला सतत त्रास देत त्याच्याकडून तब्बल दीड कोटी रुपयांची खंडणी उकळली. व्यवसायात अडथळे निर्माण होऊ नयेत तसेच टोळी कडून ‘प्रोटेक्शन’ मिळावे, या कारणावरून ही रक्कम मागण्यात आली होती.
यापूर्वीच बंडू आंदेकरसह २० जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. तरीही नव्या तक्रारी व पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी आणखी दोन गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील बांधकाम व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक आणि नागरी भागांमध्ये या टोळीने बेकायदेशीर दबदबा निर्माण केला होता. खंडणीसाठी दडपशाही, धमक्या आणि अनधिकृत बांधकामांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. या नव्या कारवाईनंतर आंदेकर टोळीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली असून पुढील तपासातून अजून काही गंभीर गुन्हे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.