आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 11:12 IST2025-11-28T11:09:58+5:302025-11-28T11:12:00+5:30
- पाच वर्षांतील पिस्तूल विक्रीची साखळी पोलिस शोधणार

आंदेकर टोळीने उमरटीतून आणली १५ पिस्तुले; महाराष्ट्रात एक हजारापेक्षा अधिक पिस्तुले
पुणे : गेल्या काही वर्षांमध्ये मध्य प्रदेशातील उमराटीतून एक हजारापेक्षा अधिक पिस्तुलांची विक्री महाराष्ट्रात झाल्याचे धागेदोरे पुणे पोलिसांच्या हाती लागले आहेत. उमरटी येथील पिस्तूल कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे पोलिसांनी पुण्यासह महाराष्ट्रात पिस्तुलांची विक्री करणारी साखळी शोधण्यास आता सुरुवात केली आहे. गेल्या पाच वर्षांत शस्त्र कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांशी संबंधितांची झाडाझडती तसेच उमरटी येथून अटक केलेल्या सात जणांकडेदेखील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सातही आरोपींनी नेमकी पिस्तुले कोणा-कोणाला पुरविली याची माहिती पोलिसांकडून संकलित केली जात आहे. दरम्यान, महाराष्ट्रात उमरटीतून गेल्या काही वर्षांत १००० पेक्षा अधिक पिस्तुलांची विक्री झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा आकडा आणखी मोठा असल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरात वर्चस्ववाद आणि टोळीयुद्धातून खुनाच्या घटना घडत असल्याचे विविध घटनांद्वारे दिसून आले आहे. या घटनांमध्ये खून करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तुले उमराटी या गावातून गुन्हेगारांनी आणल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी थेट मध्य प्रदेश-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील उमराटी गावात पहाटेच्या वेळी जळगाव, मध्य प्रदेश एटीएसच्या मदतीने धाडसत्र राबविले. तेथील चार कारखान्यांसह घराघरात पिस्तुले तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. याप्रकरणी, पुणे पोलिसांनी सातजणांना उमराटीतून अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन पिस्तूल व त्याला लागणारे मॅगझिन, पिस्तूल तयार करण्यासाठी लागणारे सुट्टे भाग, तसेच अन्य साहित्य जप्त केले.
शहरात किरकोळ भांडणातदेखील पिस्तुलांचा वापर होत आहे. मध्यंतरी सातत्याने हवेत गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. नंतर टोळी युद्धातून घडलेल्या आयुष कोमकरचा खून, कोंढव्यातील गणेश काळे खून, त्यापूर्वीचा वनराज आंदेकर तसेच शरद मोहोळ यांच्या खुनासाठी वापरण्यात आलेले पिस्तूलही उमरटीतूनच आल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात वापरलेली बहुतांश पिस्तुले उमरटी गावातून आणण्यात आली आहेत.
वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला म्हणून आंदेकर टोळीने आयुष कोमकरचा गोळ्या झाडून खून झाला. या गुन्ह्यात उमरटीतून पिस्तूल आणले गेले होते. ते पिस्तूल उमरटीतून अटक केलेल्या आरोपींनी दिले. त्यामुळे या एजंटना आयुष कोमकर खून प्रकरणात दाखल असलेल्या मकोकात सहआरोपी केले जाणार असल्याची माहितीदेखील पोलिसांनी दिली.
आंदेकर टोळीने आणली १५ पिस्तुले...
आंदेकर टोळीने उमरटी येथून तब्बल पंधरा पिस्तुले विकत आणल्याचे आतापर्यंतच्या तपासात समोर आले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. त्यातील काही पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत. काही पिस्तुले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे ती पिस्तुले कोणाकडे आहेत, याचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विमानतळ पोलिसांकडे दाखल असलेल्या आर्म ॲक्टच्या गुन्ह्यात बंडू आंदेकर याला आरोपी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.