३० मार्कांची धमकी..! विद्यार्थिनींना व्हॉट्सॲपवर नको ‘ते’ मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:27 IST2026-02-15T17:26:58+5:302026-02-15T17:27:12+5:30
- हा शिक्षक स्थानिक असल्यामुळे मुलींना दम देत असे की, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे मुली सतत घाबरलेल्या असायच्या

३० मार्कांची धमकी..! विद्यार्थिनींना व्हॉट्सॲपवर नको ‘ते’ मेसेज पाठवणाऱ्या प्राध्यापकावर गुन्हा दाखल
माळेगाव : माळेगाव शहरातील एका कॉलेजमधील एका प्राध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींना अश्लील संदेश पाठवून छळल्याबद्दल पोक्सोसह इतर गुन्हा दाखल केला गेला आहे. यामुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली असून, सर्व पालकवर्ग या घटनेमुळे चिंतेत आहेत. आम्ही आमच्या मुलींना कोणाच्या भरवशावर शिक्षणासाठी पाठवायचे, असा प्रश्न समोर आला आहे.
शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या प्राध्यापक नितीन शंकर तावरे (वय ४२, रा. सांगवी, ता. बारामती), असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या विरोधात संदीप रमेश शहा यांनी फिर्याद दिली आहे. हा शिक्षक स्थानिक असल्यामुळे मुलींना दम देत असे की, माझे कोणीही वाकडे करू शकत नाही. त्यामुळे मुली सतत घाबरलेल्या असायच्या. नराधम प्राध्यापक नितीन तावरे यांनी डिप्लोमा इंजिनिअर शाखेत प्रथम वर्षात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींना, त्यांच्या इच्छेविरुद्ध अश्लील भाषेत व्हॉट्सॲपवर संदेश पाठवले. या संदेशाला उत्तर न दिल्यास माझ्या हातात असलेल्या ३० मार्कांचा इशारा देत होते.
तसेच, वर्गात शिकवत असताना विद्यार्थिनींना स्पर्श करणे, त्यांच्या जवळ जाणे, बेंचवर हात ठेवून शरीरास हात लावण्याचा प्रयत्न करणे, मुलींच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, त्यांनी विरोध केला तर वर्गात टार्गेट करून अपमान करणे, अशी कृत्ये २२ जानेवारी ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास उपनिरीक्षक देविदास साळवे करीत आहेत.