पुणे : स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या बलात्कार प्रकरणाला गुरुवारी (दि. २६) एक वर्ष पूर्ण होत आहे. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. एसटीच्या प्रवासी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या अनेक घोषणा केल्या होत्या. मंत्री महोदयांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. मात्र, वर्षभर उलटूनही स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन बसस्थानकांत अनेक उपाययोजना अपुऱ्याच राहिल्याचे वास्तव समोर येत आहे.
शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन ही राज्यातील सर्वाधिक वर्दळीची बसस्थानके आहेत. या तीनही बसस्थानकांतून दररोज दोन हजारांहून अधिक बसची ये-जा असते. यातून दैनंदिन ६० ते ७० हजार प्रवासी प्रवास करतात. यामुळे ग्रामीण भाग, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राकडे जाणाऱ्या बसगाड्या दिवसरात्र ये-जा करतात. शिवाय हजारो महिला, विद्यार्थी, कामगार आणि ज्येष्ठ नागरिक ये-जा करतात. मात्र, रात्रीच्या वेळी परिसरात पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याचे चित्र आजही ‘जैसे थे’ आहे. शिवाजीनगर, स्वारगेटसारख्या महत्त्वाच्या बसस्थानकांवर प्रवाशांची सुरक्षा ही केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरावी, अशी अपेक्षा प्रवासी व्यक्त करत आहेत. वर्ष उलटले तरी प्रश्न कायम आहेत. आता तरी ठोस पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी प्रशासनाकडून सुरक्षा उपाययोजना टप्प्याटप्प्याने राबविल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच उर्वरित कामे पूर्ण केली जातील, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्ष बदल दिसून येणे गरजेचे आहे.
काय होती प्रशासनाची आश्वासने?
- संपूर्ण स्थानक परिसरात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे.
- महिला सहाय्यता कक्ष स्थापन करणे.
- २४ तास खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती.
- पोलिसांबरोबर संयुक्त गस्त.
- तक्रार नोंदवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करणे.
- अंधाऱ्या ठिकाणी अतिरिक्त प्रकाशयोजना करणे.
- काही ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले असले तरी सर्व कॅमेरे कार्यरत नसल्याच्या तक्रार आहेत.
- महिला सहाय्यता कक्षाचे कामकाजही सातत्याने सुरू नसल्याचे दिसून येते.
प्रत्यक्षात अशी आहे स्थिती?
- रात्री उशिरा बसस्थानक परिसरात अंधारे कोपरे अजूनही दिसून येतात.
- सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
- संशयित व्यक्तींची वर्दळ रोखण्यासाठी ठोस यंत्रणा नाही.
- संयुक्त गस्त नियमित नसल्याने महिलांना विशेषतः असुरक्षित वाटते.
- घटनेनंतर काही दिवस कडक सुरक्षा दिसली; पण नंतर परिस्थिती पूर्ववत झाली आहे.
- विद्यार्थिनी, रात्री प्रवास करणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण अद्याप कायम आहे.
- दोन्ही गेटवर रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक ठेवणे बंधनकारक आहे.
प्रवाशांच्या या आहेत मागण्या
- सुरक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट जाहीर करावे.
- महिला पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती करावी.
- सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा.
- रात्रीच्या बसफेऱ्यांमध्ये सुरक्षा रक्षक उपलब्ध करावेत.
- केवळ घोषणांपेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करून कृती करण्यात यावी.
Web Summary : A year after the Swargate bus station rape, enhanced security promises remain unfulfilled. Key bus stations lack adequate nighttime security despite assurances. CCTV cameras are not fully functional, and women's help desks are inconsistent. Passengers demand better safety measures and implementation.
Web Summary : स्वारगेट बस स्टेशन बलात्कार के एक साल बाद भी सुरक्षा के वादे अधूरे हैं। प्रमुख बस स्टेशनों पर रात में पर्याप्त सुरक्षा का अभाव है, सीसीटीवी कैमरे पूरी तरह कार्यात्मक नहीं हैं, और महिला सहायता डेस्क असंगत हैं। यात्री बेहतर सुरक्षा उपायों और कार्यान्वयन की मांग करते हैं।