पुणे - शहरातील बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने हरवलेले मोबाईल शोधून काढत पुन्हा मूळ मालकांच्या स्वाधीन करण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एकूण ५ लाख ११ हजार रुपये किमतीचे तब्बल ५० मोबाईल फोन नागरिकांना परत करण्यात आले.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक स्वपनील लोहार, पोलीस अमलदार निलेश पाळवे, प्रविण पाडळे यांच्या पथकाने अत्याधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून व समन्वय साधत ही कामगिरी केली.
हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. मोबाईल हरवल्याची तक्रार नोंदविल्यानंतर त्यांचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी ठरले. पोलिसांच्या या कार्यवाहीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.