२१ किलो चांदी, मुकुट, सिंहासन; खरपुडी खंडोबा मंदिरात चाळीस लाखांची चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 14:07 IST2025-12-05T14:01:40+5:302025-12-05T14:07:30+5:30
सकाळी पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजेसाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे.

२१ किलो चांदी, मुकुट, सिंहासन; खरपुडी खंडोबा मंदिरात चाळीस लाखांची चोरी
राजगुरूनगर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखले जाणारे (प्रति जेजुरी) खरपुडी खंडोबा (ता. खेड) मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि दानपेटी फोडून अंदाजे चाळीस लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, खरपुडी खंडोबा मंदिर डोंगरावर असून, शुक्रवारी मध्यरात्री मंदिर परिसरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी डाव साधला. मुख्य मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. खंडोबा–म्हाळसा व बानूच्या मूर्तीवरील चांदीचे हार, उत्सव मूर्ती, स्वयंभू पिंडीचे चांदीचे कवच, देवाची पगडी, चांदीचे सहा हार, बानू–म्हाळसा मुकुट, सिंहासन, वाघ मूर्ती अशा मिळून सुमारे २१ किलो चांदीसह दानपेटीत असलेले अंदाजे ६० ते ७० हजार रुपये असा एकूण चाळीस लाखांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
सकाळी पहाटे पाच वाजता पुजारी देवपूजेसाठी आले असता चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा संपूर्ण बंद असल्याचे समोर आले आहे. चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, घटनास्थळी पोलिस दाखल होऊन पंचनामा सुरू आहे.