'माझ्या लेकाने सिग्नलवर नव्हे माझ्या तोंडावर लघुशंका केली’; मुलाच्या कृत्याची बापाला लाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 15:54 IST2025-03-08T15:53:42+5:302025-03-08T15:54:44+5:30
मनोज रमेश अहुजा यांनी माध्यमांशी बोलतांना संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे

'माझ्या लेकाने सिग्नलवर नव्हे माझ्या तोंडावर लघुशंका केली’; मुलाच्या कृत्याची बापाला लाज
- किरण शिंदे
पुणे - शहरातील शिस्तप्रिय आणि सुसंस्कृत प्रतिमेला गालबोट लावणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मद्यधुंद तरुणाने लक्झरी गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून वाहतुकीला अडथळा केला आणि सिग्नलवरच लघुशंका केली. यावेळी लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने थेट त्यांच्या दिशेने अश्लील चाळे करत अनैतिक वर्तन केलं. हा तरुण गौरव मनोज अहुजा असून, त्याच्या वडिलांच्या नावावर गाडी नोंदणी आहे. या प्रकारानंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौकशीसाठी वडील मनोज रमेश अहुजा यांना ताब्यात घेतलं.
या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात संतापाची लाट उसळली आहे. एका उच्चभ्रू घरातील तरुणाने रस्त्यावर असा माज दाखवणं आणि सार्वजनिक ठिकाणी असे वर्तन करणं अतिशय निंदनीय आहे. विशेष म्हणजे, त्याच्या वडिलांनीही आपल्या मुलाच्या वर्तनाचा निषेध करत लाज व्यक्त केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद बेशिस्तपणा सहन केला जाणार नाही!
“माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नाही, तर माझ्या तोंडावर केली आहे… त्याच्या वर्तनाची मला लाज वाटते…” हे उद्गार आहेत मनोज अहुजा यांचे, जे स्वतः या प्रकरणात जबाबदारी स्वीकारत आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीनगर पोलीस चौकीत गुन्हा नोंदवला असून, तरुणाचा शोध सुरू आहे. त्याचा मोबाईल सकाळपासून बंद असून, त्याच्या घरच्यांनीही शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
कायदा सर्वांसाठी समान.! अशा माजोरड्यांवर कठोर कारवाई होणार का?
या प्रकारानंतर सामाजिक माध्यमांवर नागरिकांनी संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. एका शहराच्या शिस्तीचा असा भंग करणं आणि सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य वर्तन करणं हे कायद्याने गंभीर गुन्हे आहेत. पोलिसांनी या मद्यधुंद माजोरड्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तत्पूर्वी, पोलीस अधिकारी यांनी सांगितले, 'पोलीस स्टेशन येरवडा हद्दीतील शास्त्रीनगर चौकात मद्यधुंद अवस्थेत एका तरुणाने आपल्या चारचाकी वाहनातून उतरून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरच लघुशंका करत अश्लील चाळे केल्याचे दिसून आले. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्यामुळे त्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी शोध पथके रवाना केलेली आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.'