१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 21:11 IST2025-04-15T21:10:55+5:302025-04-15T21:11:47+5:30
पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले

१०० कोटींच्या ऑर्डरची बतावणी करत बिहारमध्ये बोलावून खून..! पुण्यातील उद्योजकाच्या हत्येने खळबळ
पुणे : खाणीतील खोदकामाच्या उपकरणांचा १०० कोटी रुपयांची ऑर्डर देण्याच्या बहाण्याने बिहारमध्ये बोलावून घेऊन कोथरूडमधील एका उद्योजकाची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित उद्योजक पाटणा विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला आहे. त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार रुपये काढून घेतल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पाटणा विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५, रा. डीपी रस्ता, कोथरूड), असे उद्योजकाचे नाव आहे. शिंदे हे रत्नदीप कास्टिंग या उद्योगाचे संचालक होते. पुणेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांना एक ई-मेल आला होता. त्यावरून त्यांनी संबंधितांना फोन केला होता. ‘झारखंडमधील एका खाणीचे खोदकाम करण्यासाठी उपकरणे हवी असून, १०० कोटी रुपयांची ऑर्डर आहे’, अशी बतावणी समोरून करण्यात आली. त्यानंतर संबंधितांनी शिंदे यांना बिहारमधील पाटणा शहरात बैठकीसाठी बोलावून घेतले. त्यानुसार शिंदे हे ११ मार्च रोजी विमानाने पाटणा येथे पोहोचले. जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मुलीस याबाबत कल्पना दिली होती. तेथे पोहोचल्यानंतर शिंदे यांचे संबंधितांसोबत बोलणे झाले, त्यानुसार शिंदे यांनी कुटुंबीयांशी संपर्क साधून आपण पाटण्यातून झारखंड येथील खाण पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले.
त्यानंतर वारंवार संपर्क करूनही तो होत नसल्याने शिंदे यांच्या कुटुंबाने १२ एप्रिल रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी शिंदे यांचे लोकेशन तपासल्यानंतर ते बिहारमधील गुन्हेगारी पट्टा असलेल्या वेगवेगळ्या भागांत आढळून आले. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांचे एक पथक पाटणा येथे रवाना झाले. पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर शिंदे यांचे विमानतळावरूनच अपहरण झाल्याचे समोर आले. त्यानंतर पुणे पोलिस आणि पाटणा विमानतळ पोलिसांनी शिंदे यांचा शोध घेतल्यानंतर सोमवारी (१४ एप्रिल) बिहारमधील जहानाबाद परिसरात शिंदे यांचा मृतदेह सापडला.
दरम्यान, आरोपींनी शिंदे यांच्या बँक खात्यातून ९० हजारांची रक्कम काढून घेऊन मोबाइलमधील सर्व माहिती डिलीट केल्याचे उघड झाले. पाटणा पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. शिंदे यांची हत्या १२ एप्रिल रोजी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, हत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. त्यांचे पार्थिव मंगळवारी सायंकाळी विमानाने पुण्यात आणण्यात येणार आहे. त्यानंतर कोथरूडमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शिंदे कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा मृतदेह बिहार येथील जहानाबाद जिल्ह्यात सापडला आहे. आरोपींनी त्याच्या बँक खात्यातून 90 हजार रुपये काढल्याचे समोर आले आहे. अधिक तपासामध्ये गुजारातच्या व्यापार्यालाही अशाच प्रकार बिहार येथे बोलवून त्याचे अपहरण करून त्याच्याकडील अडीच लाख रूपये मारहाण करून जबदरस्तीने काढून घेतले होते. नंतर त्याला सोडूनही देण्यात आले होेते. असाच प्रकार यागुन्ह्यात झाल्याचे दिसून येत आहे. या निमित्ताने आरोपींची गुन्ह्या करण्याची पद्धतीही समोर आली आहे. -अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.