Pune Crime : राजगुरुनगरजवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
By किरण शिंदे | Updated: May 23, 2025 19:57 IST2025-05-23T19:56:25+5:302025-05-23T19:57:36+5:30
गेल्याचार महिन्यांत ही अशा प्रकारची चौथी घटना असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.

Pune Crime : राजगुरुनगरजवळील चांडोलीत अल्पवयीन तरुणीवर अत्याचार
चांडोली (ता. खेड) - येथे पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. गावात आचारी काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांत ही अशा प्रकारची चौथी घटना असून, नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
अधिकच्या माहितीनुसार, अत्याचारानंतर संबंधित अल्पवयीन मुलगी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे. चांडोली येथील केदारेश्वर बंधाऱ्याजवळ तिच्या ओढणी आणि चप्पल आढळून आल्याने, तिने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यामुळे कुटुंबियांसह संपूर्ण गावामध्ये चिंता आणि खळबळ उडाली आहे.
दरम्यान, केदारेश्वर बंधाऱ्याजवळील भिमा नदीमध्ये पिडित मुलीचा शोध घेण्यासाठी NDRF च्या दोन टीम गेल्या तीन दिवसांपासून शोधमोहीम राबवत आहेत. मात्र अद्याप मुलीचा काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. पिडित मुलीच्या बहिणीने राजगुरुनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध POSCO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नराधमाला अटक केली आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण पसरलं असून, नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे ठोस कारवाई आणि सुरक्षा उपायांची मागणी केली आहे. अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.