बंगळुरू येथील एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त; ५५ कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 13:56 IST2025-12-28T13:55:57+5:302025-12-28T13:56:14+5:30
- अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची धडक कारवाई

बंगळुरू येथील एमडी ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त; ५५ कोटी ८८ लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे : महाराष्ट्र राज्य अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज तयार करणारे तीन अवैध कारखाने उद्ध्वस्त केले. या कारवाईत ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंत याप्रकरणी, चौघांना अटक केली, तर त्यांचे दोघे साथीदार फरार आहेत. या कारवाईने आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. महाराष्ट्र शासनाने अमली पदार्थांची विक्री, पुरवठा व वितरण रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सची स्थापना केली असून सध्या राज्यात सात विभागीय कृती कार्यालयांमार्फत प्रभावी कारवाया सुरू आहेत.
२१ डिसेंबर रोजी टास्क फोर्सच्या कोकण पथकाने नवी मुंबईतील वाशी गावाजवळील जुन्या बस डेपो परिसरात छापा टाकून आरोपी अब्दुल कादर रशीद शेख याच्याकडून १ किलो ४८८ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याची बाजारभावानुसार किंमत १ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये इतकी असून या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याच्या पुढील तपासात तसेच तांत्रिक विश्लेषणातून बेळगाव येथे राहणारा आणि एमडी ड्रग्ज तयार करणारा प्रशांत यल्लापा पाटील याचे नाव निष्पन्न झाले. चौकशीतून बंगळुरू शहरात एमडी ड्रग्ज तयार करणारे तीन कारखाने सुरू असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिस पथकाने बंगळुरूमध्ये कारवाई करत राजस्थानचा रहिवासी पण सध्या बंगळुरूमध्ये अमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करणारे सुरज रमेश यादव आणि मालखान रामलाल बिश्नोई या दोघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत स्पंदना ले-आउट कॉलनी, एनजी गोलाहळी भागातील ‘आर जे इव्हेंट’ नावाचा कारखाना तसेच येरपनाहळी-कन्नूर भागातील लोकवस्तीत असलेले आरसीसी घर येथे एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी छापे टाकून, ४ किलो १०० ग्रॅम एमडी ड्रग्ज, द्रव स्वरूपातील १७ किलो एमडी, एमडी तयार करण्याची यंत्रसामग्री व विविध रसायने असा एकूण २१ किलो ४०० ग्रॅम एमडी ड्रग्जसह ५५ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तिन्ही ठिकाणचे कारखाने तत्काळ नष्ट करण्यात आले. प्राथमिक तपासात या कारखान्यांत तयार झालेले एमडी ड्रग्ज देशातील अनेक राज्यांत वितरित केले जात असल्याचे तसेच आरोपींनी बंगळुरू शहरात अमली पदार्थांच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन मुख्य आरोपींच्या शोधासाठी पथके कार्यरत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलिस महासंचालक सुनील रामानंद, विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृती गटाचे पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, अपर पोलिस अधीक्षक कृष्णात पिंगळे, कोकण कृती गटाचे पोलिस उपाधीक्षक रामचंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक संतोष गावशेते, नीलेश बोधे, सहायक पोलिस निरीक्षक उदय काळे, माधवानंद धोत्रे यांच्या पथकाने केली.