कर्नाटकातून कारद्वारे आणलेला १२ लाखांचा गांजा पकडला
By नितीश गोवंडे | Updated: March 23, 2025 16:37 IST2025-03-23T16:36:00+5:302025-03-23T16:37:28+5:30
पुणे : कर्नाटकातून कारने शहराच्या मध्य वस्तीत गांजा घेऊन आलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्या गाडीतून तब्बल ...

कर्नाटकातून कारद्वारे आणलेला १२ लाखांचा गांजा पकडला
पुणे : कर्नाटकातून कारने शहराच्या मध्य वस्तीत गांजा घेऊन आलेल्या तस्कराला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्या गाडीतून तब्बल १२ लाख रुपयांचा ६० किलो ६७ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. नदिम मोईज शेख (२८, रा. जुना मायलोर, हनुमान मंदिराजवळ, बिदर, कर्नाटक) असे या तस्कराचे नाव आहे. शेख हा मूळचा कर्नाटक राज्यातील राहणारा असून तो फॅब्रिकेशनचे काम करतो.
अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना शंकरशेट रोडवरील सेव्हन लव्हज येथील हॅण्डलूम हाऊस शॉपच्या समोर एक जण चारचाकी वाहनामध्ये संशयास्पदरीत्या बसलेला दिसून आला. पोलिसांनी गाडीची झडती घेतली. त्यावेळी गाडीमध्ये चार नायलॉनच्या पोत्यांमध्ये भरलेली ३० पाकिटे असा एकूण ६० किलो ६७ ग्रॅम गांजा आढळून आला.
पोलिसांनी गांजा, मोबाइल व गाडी असा १७ लाख १० हजार ४४० रुपयांचा माल जप्त केला. हा गांजा कोठून आणला व कोठे विक्री करणार होता, याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलिस अंमलदार विशाल दळवी, सचिन माळवे, संदीप शिर्के, सुजीत वाडेकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, संदेश काकडे आणि दत्ताराम जाधव यांनी केली.